

Vidarbha Rain Forecast
esakal
नागपूर : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले असून, ते विदर्भासह मध्य भारताकडे सरकत आहे. त्याच्या तीव्र प्रभावामुळे विदर्भात २३ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तसेच अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाचा हा इशारा बळीराजासाठी चिंतेचीही बाब राहणार आहे. दोन दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भातील तापमान वाढल्यामुळे उकाडा जाणवत असला तरी, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे लवकरच वातावरण बदल अपेक्षित आहे.
चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो ओडिशा-उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यास विदर्भासह मध्य भारतातही पावसाचे क्षेत्र विस्तारू शकते.
या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान विभागातर्फे येत्या बुधवारपासून विदर्भात मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २४ व २५ सप्टेंबरला पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार किंवा अतिवृष्टी होऊ शकते.
२७ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस राहण्याचा अंदाज आहे. देशातून नैर्ऋत्य मोसमी पाऊस परतीच्या प्रवासाला लागला असतानाच ही नवी प्रणाली सक्रिय झाल्याने विदर्भात सप्टेंबरअखेरपर्यंत पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची तूटही काही प्रमाणात भरून निघू शकते.
हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट लक्षात घेता विदर्भातील शेतकऱ्यांनाही आगामी काळात अधिक सतर्क राहावे लागणार आहे. संभाव्य जोरदार पावसामुळे एकीकडे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळणार असली, तरी दुसरीकडे शेतमालाचेही अतोनात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी-नाले, सखल भाग आणि शेतीमध्ये पाणी जमा होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.