उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; कोण मारणार बाजी? आता निकालाकडे लक्ष

Voting is done for graduate constituency Election in Nagpur
Voting is done for graduate constituency Election in Nagpur

गडचिरोली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवार (ता. 1) विभागातील 322 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. यावेळी नागपूर आणि विदर्भातील केंद्रांवर पदवीधर मतदारांनी आपले मतदान केले असून या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व 19 उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे.

ही मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागपूर विभागात एकूण 1288 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदारांना मतदानापूर्वी थर्मल स्क्रिनिंग तसेच मास्कचा वापर करूनच आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी केले होते. त्यानुसार सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांचा प्रवेश सुरू झाला. 

मतदान केंद्रापासून शंभर मिटर अंतरावर विविध पक्षांनी आपले मंडप उभारले होते. काही ठिकाणी मतदारांसाठी चहा, नाश्‍त्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. इतर ठिकाणी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान असले, तरी गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने येथे सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाचा कालावधी होता. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांनी मास्क लावले की नाही, सॅनिटायझरचा वापर केला की, नाही, याची पोलिस पाहणी करत होते. तसेच गर्दी होऊ नये म्हणून दहा-दहाच्या गटाने मतदारांना मतदानासाठी पाठविण्यात येत होते. पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात 19 उमेदवार नशीब आजमावत आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदार संघात एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदार आहेत. 

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 19 उमेदवार रिंगणात असून यात अभिजित वंजारी ( भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ), संदीप जोशी (भाजप), राजेंद्रकुमार चौधरी (रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया), इंजिनिअर राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), ऍड. सुनीता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी), अतुलकुमार खोब्रागडे (अपक्ष), अमित मेश्राम(अपक्ष), प्रशांत डेकाटे (अपक्ष), नितीन रोंघे (अपक्ष), नीतेश कराळे (अपक्ष), डॉ. प्रकाश रामटेके (अपक्ष), बबन उर्फ अजय तायवाडे (अपक्ष),ऍड .मोहम्मद शाकीर अ.गफ्फार (अपक्ष), राजेंद्र भुतडा, प्रा. डॉ. विनोद राऊत (अपक्ष), ऍड. वीरेंद्रकुमार जायस्वाल, शरद जीवतोडे (अपक्ष), प्रा. संगीता बढे(अपक्ष), इंजिनिअर संजय नासरे(अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे. या सर्वांचे भाग्य आता मतपेटीत बंद झाले असून विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वांत कमी नोंदणी

पदवीधर मतदार संघातील एकूण सहा जिल्ह्यांपैकी सर्वांत कमी मतदारांची नोंद गडचिरोली जिल्ह्यात झाली आहे. नागपूर विभागात दोन लक्ष 6 हजार 454 मतदार असून त्यापैकी 1 लक्ष 2 हजार 809 मतदार एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. वर्धा जिल्ह्यात 23 हजार 68, भंडारा जिल्ह्यात 18 हजार 434, गोंदिया 16 हजार 934, चंद्रपूर 32 हजार 761, गडचिरोली जिल्ह्यात सर्वांत कमी 12 हजार 448 मतदारांचा समावेश आहे.

दोन गज की दूरी नाहीच...

जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्याचे सरकार कानीकपाळी ओरडून सांगत असले, तरी पदवीधर असलेल्या सुशिक्षित मतदारांवरही याचा फारसा परिणाम होत नसल्याचे मंगळवारच्या मतदान प्रसंगी दिसून आले. मतदानासाठी रांगेत असलेले सुशिक्षित पदवीधर मतदार "दो गज की दूर' ला फाटा देत साधारणत: अर्धा ते एक फूट अंतरावरच उभे असलेले दिसून आले.

वाढली मतदानाची टक्केवारी 

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत खरी लढत ही संदीप जोशी आणि अभिजित वंजारी यांच्यात आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com