Video : ऐका होऽऽ ऐका... आदिवासी गावांतील लोक काय म्हणतात कोरोनाबद्दल

What is the status of tribal village in Vidarbha due to corona virus
What is the status of tribal village in Vidarbha due to corona virus

नागपूर : देशात कोविड 19 अर्थात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन घोषित झाले. त्याचा फटका आदिवासी गावांनाही बसला. डोक्‍यावर हात ठेवून बसलेले चिंताग्रस्त ग्रामस्थ, अन्नाच्या आशेतून एकमेकांकडे आशातीत नजरांनी पाहणारे आबालवृद्ध, नजर टाकली तिथवर सर्वत्र भासणारी स्मशानशांतता, असे विदारक आणि भयावह चित्र विदर्भातील दुर्गम अशा आदिवासी गावांमध्ये दिसून येत आहे. "सकाळ'ने चिखलदरा (जि. अमरावती) तालुक्‍यातील मनभंग व सिरोंचा तालुक्‍यातील (जि. गडचिरोली) रोमपल्ली या दोन गावांना भेटी दिल्या असता भविष्याची चिंता या गावांमध्ये दिसून आली. विशेष म्हणजे, मनभंग, रोमपल्लीसारख्या अनेक दुर्गम आदिवासीबहुल गावांमध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे. 

चिखलदरा (जि. अमरावती) : सध्या जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाची दहशत केवळ महानगरांपुरतीच मर्यादित राहिलेली नसून ग्रामीण भागातसुद्धा याचे लोण पसरले आहे. एरवी कुपोषणाचे दुष्टचक्र झेलणाऱ्या मेळघाटातील दुर्गम भागातील गावकऱ्यांनासुद्धा आता आपल्या गावात लॉकडाउन होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे मेळघाटातील जंगलांमध्ये राहणारे आदिवासी बांधव सामान्यपणे कुठल्याही साथीला बळी पडत नाहीत, असा आजवरचा समज आहे. मात्र कोरोनाचा प्रसार जगभरात ज्या पद्धतीने झाला त्यातून हे गावसुद्धा दहशतीत आहे. 

चिखलदरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मनभंग या गावाची लोकसंख्या जेमतेम 500 असून येथील नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे साधन केवळ शेती आणि हातमजुरीच आहे. परंतु कोरोनामुळे गावातील लोकांना बाहेर जाण्यास निर्बंध आले. गावात काम नाही. अख्खे गाव केवळ एकमेकांकडे मदतीच्या आशेने बघत आहे. शेतीसुद्धा कोरडवाहू असल्याने त्यात करायला सध्या काहीच नाही. मजूरदेखील घरी बसून आहे. स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ मिळतो तेवढेच, बाकी जीवनावश्‍यक साहित्य कुठून जुळवावे? असा प्रश्न या गावातील प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेला आहे. 

शेती नाही, मजुरी नाही, अशा स्थितीत दिवसभर गावातील लोक आपापल्या घरासमोर ठाण मांडून बसलेले असतात. काय करावे, कुणालाच काही कळेनासे झाले आहे. आठवडाभर काम करून मिळणाऱ्या मजुरीतून उदरनिर्वाह होत होता, तोही आता बंद झाला. एक महिन्यापासून गावातील लोक गावातच आहेत. असा स्थितीत आता पुढे काय? असा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे.

सरकारकडून बॅंकेच्या खात्यामध्ये मदतीचे पैसे पाठविण्यात आले आहेत. मात्र बॅंकेची एकच शाखा असल्याने तेथे पैसे काढणाऱ्यांची गर्दी उसळते. पर्यायाने अनेकजण बॅंकेकडे फिरकलेसुद्धा नाहीत. त्यामुळे शासनाच्या मदतीचा लाभ अनेकजण घेऊ शकलेले नाहीत. 

गावात प्रवेशबंदी 
मनभंग या गावातील गावकरी आरोग्याप्रती चांगलेच जागरूक असल्याचे दिसून येते. कोरोनामुळे बाहेरील मनुष्य गावात येऊ नये, यासाठी गावाच्या वेशीवर तोडलेल्या झाडांच्या फाद्यांनी प्रवेश बंद करण्यात आला आहे. एका महिन्यापासून बाहेरील कुणी गावात आलेला नाही किंवा गावातील कुणी व्यक्ती बाहेर गेलेली नाही, असे ग्रामस्थ सांगतात.


अन्यथा स्थिती अधिकच वाईट होणार 
गावाची स्थिती गंभीर झाली आहे. मजुरी मिळत नाही, पैसा नाही, अनेकांकडे धान्यसुद्धा नाही. शासनाने एमआरईजीएसची कामे टप्प्याटप्याने द्यावीत किंवा वनविभाग अथवा ग्रामपंचायतच्या माध्यमाने काम उपलब्ध झाल्यास नागरिकांना रोजगार मिळेल. अन्यथा स्थिती अधिकच वाईट होणार आहे. 
- रूपलाल दारसिंभे, 
माजी सरपंच, मनभंग

रोमपल्लीत अनेकांवर उपासमारीची वेळ

सिरोंचा (जि. गडचिरोली) : लॉकडाउनच्या काळात गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड देत जीवन जगावे लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचेही जनजीवन ठप्प झाल्याचे दिसून येत असून हातात काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. जिल्ह्यात एकही उद्योग नसल्याने जिल्ह्यातील अनेक युवक बाजूला असलेल्या तेलंगणा राज्यात कामासाठी जात असतात. आता कोरोनामुळे अनेक युवकांना तेथून वापस स्वगावी येऊन रिकाम्या हाताने गावात राहायची वेळ आली आहे. मात्र, सिरोंचा तालुक्‍यातील आदिवासी बांधव आपल्याच घरी राहून लॉकडाउनचे पूर्ण पालन करत कोरोनाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हातात काम नसल्याने नागरिक आपल्याच घरात राहत आहेत. हातात काम नाही, खायला काही नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हाताला काम नसल्याने गावाजवळील परिसरात मोहफुल वेचत आहेत. 

गावकऱ्यांमध्ये जागरूकता

रोमपल्ली गावातील सरपंच आणि काही गावकरी गावात फिरून गावातील नागरिकांना कोरोनाविषयी जागरूक करत आहेत. शहरात घरे जवळ-जवळ असतात. मात्र, ग्रामीण भागात आदिवासी बांधवांची घरे दूर-दूर असल्याने कोरोनाच्या विषाणू प्रतिबंधासाठी मदत होत. ग्रामीण भागातील महिला हातपंप आणि विहिरीवर सोशल डिस्टन्सिग पाळत पाणी भरत असल्याचे दिसून येत आहे. सिरोंचा तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गावात जात नसून गावामध्ये कोरोनाविषयी जागृती करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. 

असा आहे दिनक्रम...

ग्रामीण आदिवासी गावांमध्ये दिनक्रम नेहमीप्रमाणे असला, तरी हातावर आणून पानावर खाणाऱ्या मजूर, शेतमजुरांना काम उरलेले नाही. सकाळी ज्यांची शेती आहे ते शेतात जातात. आता जंगलात मोह फुलू लागल्याने अनेक नागरिक मोहफूल वेचण्यासाठी जातात. त्यासोबतच कुड्याची फुले, बहाव्याची फुले, मालकांगोणीचा मोहर व इतर वनोपज, कंदमुळे गोळा करण्यात काही जणांचा वेळ जातो. मासेमारी करणारे काहीजण मासे धरण्याचे जाळे, इतर साधनांच्या दुरुस्तीत वेळ घालवतात, वृद्ध नागरिक दोर वळणे, बांबूच्या वस्तू बनविणे, यात वेळ घालवताना दिसतात. महिला सकाळी सडासारवण, घरी ढोलीत साठवलेले तांदूळ कांडणे, घरातच उखळात मिरची कांडून तिखट करणे, टोळीचे तेल काढणे, वाळवणाचे पदार्थ, वांग्यासह विविध पदार्थांच्या खुला करण्यात वेळ घालवत आहेत. बच्चेकंपनीला आता सुट्याच असल्याने ते अंगणातच खेळत आहेत. एरवी सकाळीच कामावर निघून जाणारे आई-वडील घरीच राहत असल्याने ते आनंदी आहेत. गावातील नागरिक एकत्र येणे टाळत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com