कोण बनले गोरगरिबांसाठी देवदूत ! मग वाचा ही बातमी 

PHOTO
PHOTO

नागपूर : कोरोनाने गोरगरिबांचे रोजगार हिरावून नेले, अनेकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त केले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी जीव वाचविण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर विकत घेण्याची कल्पनाही ते करू शकत नाहीत. अशा गोरगरीब गरजवंतांसाठी डॉ. दिलीप अर्जुने देवदूत बनून धावून आले आहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो गोरगरिबांना मोफत मास्क व सॅनिटायझर देऊन सामाजिक बांधीलकीचा परिचय दिलेला आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची सर्वत्र चर्चा व कौतुक होत आहे. 


लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांची ही अवस्था पाहून डॉ. अर्जुने यांनी त्यांना मदत करण्याचा निश्‍चय केला. लॉकडाउनकाळात अनेक सामाजिक संस्था तसेच श्रीमंत व्यक्‍ती गोरगरिबांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करीत आहेत. मात्र, डॉ. अर्जुने यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपयुक्‍त ठरणारे मास्क व सॅनिटायझर वाटण्याचे ठरविले. त्यांनी आतापर्यंत जवळपास सात हजार मास्क आणि दोन हजार सॅनिटायझर्स अशिक्षित गोरगरिबांना वितरित केले आहेत. रिक्षा चालविणारा असो वा कचरा वेचणारा. वृद्धाश्रम असो किंवा पोलिस ठाणे किंवा मग झोपडपट्‌टीतील गोरगरीब. प्रत्येकालाच त्यांनी मदतीचा हात दिला आहे. ते दररोज सकाळी मास्क व सॅनिटायझर्स घेऊन कारने घराबाहेर पडतात. रस्त्याच्या कडेला गोरगरीब दिसला की, त्याची आस्थेने विचारपूस करून त्याला मास्क व सॅनिटायझर देतात आणि त्याचा नियमित वापर करण्याचा सल्ला देतात. 


उल्लेखनीय म्हणजे, कुणाच्याही आर्थिक मदतीशिवाय लॉकडाउन लागल्यापासून अव्याहतपणे त्यांचा हा सामाजिक उपक्रम सुरू आहे. स्वत:च्या मिळकतीतून ते संपूर्ण खर्च करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असेपर्यंत आपले हे समाजकार्य सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. अर्जुने यांनी केवळ शहरातच नव्हे, इतरही राज्यांत त्यांनी मदत पोहोचविली आहे. अनेकांनी त्यांच्या या योगदानाची स्तुती केली आहे. या कार्याबद्दल त्यांना प्रशस्तिपत्रेही मिळाली आहेत. मास्क व सॅनिटायझर वाटण्यासोबतच ते कोरोनाविषयी जनजागृतीही करतात. कोरोनाची अजिबात भीती न बाळगता, मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करण्याचा तसेच "सोशल डिस्टन्सिंग' ठेवून धैर्याने सामना करण्याचा ते सर्वसामान्यांना सल्ला देतात. त्याचवेळी ब्लडप्रेशर, शूगरसारख्या जुन्या बिमारींकडेही दुर्लक्ष न करण्याचे ते या निमित्ताने लोकांना आवाहन करीत आहेत. नंदनवन परिसरातील तिरंगा चौकात पॅथॉलॉजी चालविणारे उच्चविद्याविभूषित डॉ. अर्जुने गेल्या दोन दशकांपासून वैद्यकीय व्यवसायाशी जुळलेले आहेत. 

कोरोनामुळे गोरगरिबांचे होणारे हाल पाहून मला त्यांच्याविषयी काहीतरी करण्याची इच्छा झाली. अनेक जण अन्नधान्य वाटप करीत आहेत. मात्र, मी मास्क व सॅनिटायझर्स देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत असंख्य गोरगरिबांना मदतीचा हात देऊन या संकटकाळात खारीचा वाटा उचलला आहे. या निमित्ताने समाजासाठी काहीतरी केल्याचे मानसिक समाधान आहे.' 
-डॉ. दिलीप अर्जुने, पॅथॉलॉजीस्ट 
 
 

संपादन : नरेश शेळके 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com