esakal | 'ब्लॅक मार्केट' अन् तेही पुस्तकांचे, पुस्तक घेताना अशी होऊ शकते फसवणूक

बोलून बातमी शोधा

world book day
'ब्लॅक मार्केट' अन् तेही पुस्तकांचे, पुस्तक घेताना अशी होऊ शकते फसवणूक
sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : चित्रपटांच्या सीडी, तिकिटे तसेच कोरोना काळामध्ये औषधांचे 'ब्लॅक मार्केट' होत असल्याचे आपण ऐकले आहे. पण ऑनलाइन युगात पुस्तकांचेसुद्धा 'ब्लॅक मार्केट' होत असल्याची बाब पुढे आली आहे. ऑनलाइन विक्रीच्या माध्यमातून नावाजलेल्या पुस्तकांची ब्लॅक मार्केटींग होत आहे.

हेही वाचा: 'ते' पाळतात माणुसकीचा धर्म! मुस्लिम तरुण रचतात चिता अन्‌ देतात भडाग्नीही; 923 मृतांवर अंत्यसंस्कार

पुस्तकांच्या नक्कल प्रती अ‌ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या मोठ्या वेबसाइटच्या माध्यमातून विकल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पुस्तकांच्या या 'ब्लॅक मार्केट'ने चांगला जम बसवला आहे. दरवर्षी कोटींच्या घरामध्ये या 'ब्लॅक मार्केट'ची उलाढाल होते. या प्रकारामुळे प्रकाशक संस्थांसह लेखकांना मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागत असून काही छोट्या प्रकाशन संस्था बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत.

मुख्यत: लेखक या गंभीर प्रकारामुळे जेरीस आले आहेत. प्रकाशकांकडून लेखकांना मिळणाऱ्या रॉयल्टीच्या रकमेमध्ये या 'ब्लॅक मार्केट'मुळे तफावत आढळते. तर, प्रसिद्धीचे वलय नसणाऱ्या लेखकांना काहीच रॉयल्टी मिळत नाही. प्रशासनाच्या कुठल्याही विभागाच्या आधिपत्याखाली हा विषय येत नसल्याने तक्रार कुठल्या विभागाकडे करावी? हा प्रश्‍न प्रकाशक आणि लेखकांपुढे आहे. त्यामुळे, पुस्तकांचे हे 'ब्लॅक मार्केट' लेखकांच्या आणि पुस्तक प्रकाशक संस्थांच्या मुळावर उठले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

हेही वाचा: कर्मचाऱ्यांनो! 11च्या आधी पोहोचा कार्यालयात, अन्यथा जावे लागेल पोलिस ठाण्यात

पुस्तकांचे सर्व व्यवहार ऑनलाइन होत असल्याने प्रकाशन आणि लेखकांना याचा कुठलाही थांगपत्ता नसतो. यावर कायद्यानुसार पावले उचलणे खूपच किचकट आहे. याला आळा बसावा म्हणून कुठलाही ठोस कायदा नाही. तसेच प्रशासनाचा विशिष्ट विभागसुद्धा नाही. त्यामुळे वाचकांनी ऑनलाइन वा फुटपाथवरून पुस्तकांची खरेदी करू नये.
- सचिन उपाध्याय, विजय प्रकाशन, नागपूर.

काही मिनटांमध्ये नक्कल प्रत -

'ब्लॅक मार्केट'मध्ये विक्रीस असलेली पुस्तके 'प्रिंट ऑन डिमांड' या मशिनमधून छपाई केलेली असतात. आधी या मशिनची किंमत आठ कोटी रुपये होती. त्यामुळे नक्कल केलेली पुस्तके छापण्याचे प्रकार क्वचित होत होते. आता ही मशिन चाळीस लाख रुपयांमध्ये मिळत असून शहरात अशा सहा मशिन आहेत. यातून पुस्तकाची नक्कल केलेली प्रत काही मिनिटांमध्ये छापून मिळू शकते. तसेच, अशा प्रतींची फुटपाथवरही विक्री होत असल्याने मूळ किमतीपेक्षा पंचवीस ते साठ टक्क्यांपर्यंत त्यावर सवलत दिली जाते. विशेष म्हणजे हौसेखातर पुस्तके छापणारे प्रकाशकसुद्धा 'प्रिंट ऑन डिमांड' या मशिनचाच वापर करतात.

संपादन - भाग्यश्री राऊत