नागपुरी बोलीच्या नावावर टिंगलटवाळी !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

धिक्कार करावा
पहिल्या अंकापासूनच बायको नागपूरची दाखवून तिची यथेच्छ टिंगलटवाळी सुरू आहे. नागपूर वा विदर्भ अजूनही इतका मागास दाखविण्याचा प्रयत्न पटत नाही. आजच्या नागपूरच्या मुली अत्यंत प्रगत आहेत. ग्रामीण भागातील अस्सल गावठी भाषा अजूनही श्रीमंत आहे. पण, त्याचा अभ्यास निर्माता-दिग्दर्शकाने केलेला दिसत नाही. या मालिकेद्वारे नागपूरची पर्यायाने विदर्भाची होणारी निंदानालस्ती निषेधार्ह आहे. नागपूरकरांनी याचा धिक्कार करावा.
- विजया पावशे-नंदापुरे

लहेजा वेगळा आहे
नागपुरी भाषेचा एक वेगळा टोन आहे. वेगळा लहेजा आहे. ही भाषा जराशी रांगडी आहे. हिंदी शब्दांची सरमिसळ झाल्याने हिंदीचा गोडवाही तितकाच आहे. पण, लोक मूर्ख, बावळट किंवा अडाणी नाहीत.
- वसुधा कुळकर्णी

नागपूर - एका वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेत नागपुरी बोलीच्या नावावर अक्षरशः टिंगलटवाळी सुरू आहे. अशा पद्धतीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा प्रेक्षकांनी "सकाळ‘च्या माध्यमातून दिला आहे. सोशल मीडियावरदेखील यासंदर्भातील चर्चेत अतिशय आक्रमक भूमिका वैदर्भी प्रेक्षकांनी घेतली आहे.

यापूर्वी याच वाहिनीवर एका मालिकेत नागपूरचे पात्र दाखवून त्याच्या तोंडी भलतीच भाषा नागपूरच्या नावावर खपविण्यात आली. "सकाळ‘ने हा विषय लावून धरल्यानंतर निर्मात्याला ते पात्रच वगळावे लागले. पुन्हा असा प्रकार होणार नाही, असे अपेक्षित होते. मात्र, नागपूरच्याच लेखकाने लिहिलेल्या या मालिकेतील नटी अतिशय विचित्र पद्धतीने इकडची भाषा बोलतेय. मुळात नागपूरचे लोक अशी भाषा बोलतच नाहीत. नागपुरी किंवा वैदर्भी भाषेचा लहेजा यापेक्षा फार वेगळा आहे. पण, भाषेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप प्रेक्षकांकडून होतोय. यापूर्वी स्व. विनय आपटे, अरुण नलावडे, मकरंद अनासपुरे यांच्यासारखे दिग्गज नटही वैदर्भी भाषा बोलताना दिसले. पण, त्यांनी भाषेचा अभ्यास करताना तडजोड केली नाही. या मालिकेतील "नवऱ्याची बायको‘ नागपूरचे पात्र म्हणून रंगविण्याचा प्रयत्न झाला आहे. एकतर तिची बोली नागपुरी नाही शिवाय ती नागपूरची म्हणून भाषा आणि वागण्यावरून तिची टिंगलटवाळीदेखील होतेय. "नागपूरच्या मुली एवढ्या मागास आहेत का?‘ असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. या मालिकेत "ट्‌वीस्ट‘ येणार, असा युक्तिवादही होतोय. म्हणून चुकीची बोली नागपूरच्या नावावर खपविण्याचे समर्थन करावे काय? "व्वा गुरू‘!

 

Web Title: Nagpuri bid of jesting name!