नागपुरातून लढण्यासाठी कॉंग्रेसकडे अनेक पैलवान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 सप्टेंबर 2018

नागपूर : नागपुरातून लढण्यासाठी विलास मुत्तेमवारांनीही प्रोत्साहन दिले. मात्र कॉंग्रेसकडे अनिस अहमद, बबनराव तायवाडे, नितीन राऊत, प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासारखे अनेक पैलवान आहेत. हा कार्यक्रम नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या अराजकता पसरविणाऱ्या सरकारविरोधात असल्याचे नमुद करीत विलास मुत्तेमवार किंवा अशोक चव्हाण यांच्याविरोधात रणनितीचा भाग नसल्याचे सांगून नाना पटोले यांनी आज सावध पवित्रा घेतला.

नागपूर : नागपुरातून लढण्यासाठी विलास मुत्तेमवारांनीही प्रोत्साहन दिले. मात्र कॉंग्रेसकडे अनिस अहमद, बबनराव तायवाडे, नितीन राऊत, प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासारखे अनेक पैलवान आहेत. हा कार्यक्रम नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या अराजकता पसरविणाऱ्या सरकारविरोधात असल्याचे नमुद करीत विलास मुत्तेमवार किंवा अशोक चव्हाण यांच्याविरोधात रणनितीचा भाग नसल्याचे सांगून नाना पटोले यांनी आज सावध पवित्रा घेतला.
बहुजन विचारमंचतर्फे रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात आयोजित त्यांच्यासह खासदार मधुकर कुकडे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमातून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यापुढे आव्हान उभे केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावरून त्यांनी कॉंग्रेसमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आपल्या भाषणातून मिहानचे श्रेय माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांना दिलेच, शिवाय त्यांचे नागपुरातून लढण्यास प्रोत्साहन असून पक्षाने उमेदवारी दिल्यास लढण्यास तयार असल्याचेही सांगितले. मात्र, मिहानच्या सद्यस्थितीवरून त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांनाही लक्ष्य केले. मेट्रो रेल्वे सुरू झाली नाही, मात्र नागपूरकरांकडून कर वसुली सुरू झाल्याचे ते म्हणाले. वाडे, बंगले पाडून महाल बनविण्याचे काम सुरू असल्याचे नमुद करीत त्यांनी केंद्रीयमंत्री गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टोला हाणला. बहुजनांच्या बळावर आलेल्या या सरकारला पदे देण्याची वेळ आल्यानंतर व्यास, जोशीच दिसतात. मराठ्यांना नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याचे आश्‍वासन देत तोपर्यंत महाभरती रद्द केल्याचे सांगून बहुजन व मराठ्यांत विष कालविण्याचे काम केल्याचा घणाघात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनील केदार होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कॉंग्रेसच्या ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ताम्रध्वज शाहू, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री अनिस अहमद, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री विनोद गुडधे पाटील, आमदार प्रकाश गजभिये, माजी खासदार मारोतराव कोवासे, डॉ. बबनराव तायवाडे, माजी खासदार समीर भुजबळ, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, माजी आमदार सर्वश्री अशोक धवड, आनंदराव वंजारी, वामनराव चटप, दीनानाथ पडोळे, माजीमंत्री छगन भुजबळ यांचे बंधू बापू भुजबळ आदी उपस्थित होते. प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी प्रास्ताविकातून बहुजन विचार मंच कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारसरणीचा राजकीय मंचच असल्याचे नमूद केले.
मावळ्यांचा जिरेटोप, तलवार भेट
माजी खासदार नाना पटोले व भंडारा-गोंदियाचे खासदार मधुकर कुकडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उभय नेत्यांच्या डोक्‍यावर मावळ्यांचा जिरेटोप घालून त्यांना तलवार भेट देण्यात आली. सत्काराला उत्तर देताना मधुकर कुकडे यांनी विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्येकाचेच आभार मानले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nana patole satkar nagpur