‘हम नगरसेवक हैं,भाजपा के प्रचारक नहीं’

Nanda-Jichkar-kamlesh-Chaudhary
Nanda-Jichkar-kamlesh-Chaudhary

प्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा घेऊन काही मोजक्‍या ठिकाणी भेटी देणे याला जनतेच्या तक्रारी, अडचणी समजून घेणे म्हणतात का, असा सवाल अनेक नगरसेवक आणि नागरिक ‘टीम सकाळ’कडे करीत आहेत. वर्षानुवर्षे शेकडो समस्यांना तोंड देत असताना  शहरातील काही झोनमध्ये केवळ ४० किंवा ५० तक्रारींची नोंद पालकमंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमासाठी होत आहे. जनतेपर्यंत याविषयीची माहितीच पोचत नसल्याने दुपारच्या सुमारास ताफा येतो, पाहणी करतो आणि निघून जातो. वाहने धूळ उडवत निघून गेल्यानंतर जमा होत असलेले नागरिक विचारतात, ‘क्‍या हुवा, क्‍यों इतनी गाडीयां आयी थी?’ याविषयी नागरिकांशी  बोलून ‘सकाळ’ने त्यांच्या व्यथा जाणून घेऊन मांडलेला हा ‘ऑन दि स्पॉट रिपोर्ट.’

तेलंगखेडीत कर्मचारीच पसरवतात कचरा
मनपाचे स्वच्छता कर्मचारीच कचरा व्यवस्थित न उचलता परिसरात घाण पसरवीत असल्याची गंभीर तक्रार तेलंगखेडी रामनगरातील विनोद कनदेव, अभय शेलारे, नीलेश बोंद्रे व सुरज सिंग यांनी केली. पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. पांढराबोडीवरून वाहून आलेला कचरा येथील रस्त्यांवर जमा होतो. त्यामुळे पावसाळ्यात हा परिसर घाण आणि दुर्गंधीने बरबटलेला असतो. याकडे नगरसेवक अजिबात लक्ष देत नसल्याचे चिडलेल्या नागरिकांनी सागितले. दरवर्षी २६ जानेवारीला झेंडावंदन कार्यक्रमासाठी आम्ही नगरसेवकांना सन्मानाने बोलवत असतो. पण सध्या नगरसेवक कामच करत नसल्याने उद्याच्या कार्यक्रमात आम्ही एकाही नगरसेवकाला बोलावणार नाही, असे सुरज सिंग म्हणाले. चिडून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले. 

रस्त्याच्या कडेने नागरिक प्रतीक्षेत; महापौरांचे दुर्लक्ष 
गिट्टीखदान येथे रिजूवान खान रूमनी काही नागरिकांना घेऊन आपल्या समस्या मांडण्यासाठी थांबलेले होते. विशेष म्हणजे धरमपेठ झोन कार्यालयात महापौरांसमवेत शाब्दिक चकमक झाल्याने दौऱ्यातून अंग काढलेले कमलेशसुद्धा जवळच उपस्थित होते. गाड्यांचा ताफा नागरिकांच्या जवळ पोचला. मात्र, त्यांना पाहून न पाहिल्यासारखे करून येथून गाड्या पुढे दामटण्यात आल्या. खान यांनी यावेळी महापौरांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला. नागरिकांशी न बोलता, त्यांच्या अडचणी जाणून न घेता अशा प्रकारे व्यवहार केल्याने प्रशासन आणि महापौरांना खरेच जनतेच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत की नाही याबद्दल शंका आहे, असे खान यांनी म्हटले आहे.

काछीपुऱ्यात द्यावे लागतात शौचास जाण्यास शंभर रुपये 
प्रभाग १५ मधील रामदासपेठ या पॉश भागाला लागून असलेली काछीपुरा ही फार जुनी वस्ती आहे. मात्र, या वस्तीतील नाल्याला लागून असलेल्या भागात अजूनही सिवेज लाइन नाही. त्यामुळे या भागातील घरांमध्ये शौचालये नाहीत. परिणामी जवळपास पन्नास ते साठ घरांतील नागरिकांना सुलभ शौचालयात आधार शोधावा लागत असून एका व्यक्तीला दर महिन्याला शंभर रुपये खर्च येत असल्याचे कल्पना चांदोणे या महिलेने सांगितले. अनेकदा रात्रीच्या वेळी घरातील वृद्ध व्यक्तींना सुलभ शौचालयापर्यंत जाताना त्रास होतो तर लहान मुलांबाबतही हाच त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा नगरसेवकांकडे सिवेज लाइनची मागणी केली.

परंतु कुणीही ऐकत नसल्याचा संतापही कल्पना चांदोणे, राजेश घाटे यांनी व्यक्त केला. या भागात नाल्याच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आल्याने वस्तीतील पावसाळी पाणीही बाहेर निघत नाही. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरते. चिमुकल्यांना डेंगीसारख्या आजाराने अनेकदा ग्रासले. काछीपुऱ्यात दर्शनी भागात सिवेज लाइन आहे. मात्र, त्याही बुजल्या असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे राजेश घाटे, लता वर्मा, संतोष सक्‍सेना, ताराबाई ठाकूर, मैनाबाई उईके, मीरा हिवराळे, नंदिनी नागदिवे यांनी महापौरांपुढे मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com