मोदींच्या अजेंड्यावर शेतकरी नाही - राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

नांदेड (जि. चंद्रपूर) - "पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या उद्योजकांच्या मदतीसाठी धावून जातात. परंतु शेतकऱ्यांच्या हलाखीची स्थितीवर त्यांना बोलायला वेळ नाही. मोदींच्या अजेंड्यावर शेतकरी नाही. ते मोठ्या उद्योजकांचे पाठीराखे आहेत. त्यामुळे मोदी आपल्यासाठी काही करतील, ही आशा आता शेतकऱ्यांनी सोडून द्यावी,' अशा शब्दांत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.

चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड येथे "किसान चौपाल'मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना त्यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. एचएमटी तांदळाचे जनक व प्रसिद्ध धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राहुल आज आले होते. त्यांनी कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांचा धनादेश दिला, तसेच एकूण साडेआठ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. यानंतर त्यांनी किसान चौपालमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. नागपूरपासून जवळपास 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या या छोट्या गावात जवळपास तीन हजारांवर शेतकरी जमा झाले होते.

या वेळी युवा शेतकरी सागर खोब्रागडे, शेतकरी रामकृष्ण देशमुख व महिला शेतकरी अविशा रोकडे यांनी राहुल गांधींना प्रश्‍न विचारले. वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कर्जमुक्ती या विषयांभोवती या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचा रोख होता. या प्रश्‍नांना उत्तरे देताना राहुल गांधींनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न केवळ कर्जमुक्तीने सुटणार नाही, याची कबुली दिली.

किसान चौपालपूर्वी राहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रदेश कॉंग्रेस पक्षातर्फे खोब्रागडे कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांचा धनादेश राहुल गांधी यांच्या हस्ते दिला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील कॉंग्रेस आमदारांतर्फे पाच लाख रुपये, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी एक लाख रुपये व एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: narendra modi ajenda farmer rahul gandhi politics