सोशल मीडियावर भाव खाऊन जातोय नथीचा नखरा, लाँकडाऊन काळातला नवा ट्रेंड!

दिनकर गुल्हाने
मंगळवार, 26 मे 2020

'नथीचा नखरा' हा ट्रेंड केवळ सेलिब्रेटींसाठी आहे, असे नव्हे तर छोटे शहर व गावपातळीवरील उत्साही  महिला नाकात नथ घालून फेसबुक वर येताना 'सांगा मी कशी दिसते?' असा गोड प्रश्न ग्रुपवरील मैत्रिणींना विचारत आहेत.

पुसद (जि. यवतमाळ) : लॉकडाऊनच्या काळात मनाला विरंगुळा म्हणून सोशल मीडियावर 'नथीचा नखरा' हा नवा ट्रेण्ड अक्षरशः धुमाकूळ घालतो आहे. अंगावर नऊवारी साडी,भाळी चंद्रकोर अन् नाकात मोत्यांची  नाजूक नथ, अशा स्त्री सौंदर्याच्या आविष्काराने सजलेल्या फोटोंनी फेसबूक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारखी सोशल मीडियांची दालने ओसंडून वाहत आहेत.
'नथीचा नखरा' हा ट्रेंड केवळ सेलिब्रेटींसाठी आहे, असे नव्हे तर छोटे शहर व गावपातळीवरील उत्साही  महिला नाकात नथ घालून फेसबुक वर येताना 'सांगा मी कशी दिसते?' असा गोड प्रश्न ग्रुपवरील मैत्रिणींना विचारत आहेत. मैत्रिणीने दिलेले 'नखरा नथीचा' हे आव्हान स्वीकारत आपल्या इतर मैत्रिणींना नखरा करण्यास उद्युक्त करीत आहेत. त्यातून विरंगुळा तर होतोच शिवाय नटण्या मुरडण्याची हौसही फिटते. सोशल मीडियाच्या आभासी जगताने लॉकडाऊनच्या काळातील मरगळ घालवून घरबसल्या महिलांना करमणुकीचे दालन उघडून दिले आहे.
सुरुवातीला काय आहे हा नथीचा नखरा ? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. स्मार्टफोनवर फेसबुक अथवा व्हाट्सअपवरील डीपी, स्टेटस पाहताना या नखऱ्याची सहजतेने जाणीव होते. महिलांचे नथ घातलेले सुंदर फोटो पाहताना कुणालाही नथीचे आकर्षण वाटल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक स्त्री नथ घातलेला सुंदर फोटो काढून मैत्रिणींना चँलेंज देतात. या महिला नथ घातलेला फोटो सोशल मीडियावर टाकून हे चॅलेंज पुढे पास करतात. सध्या तरी फेसबुक व्हाट्सअप नथ घातलेल्या फोटोंनी भरून गेले आहे.
महिलांना तसेही नट्टापट्टा करायची भारी हौस. लग्नसमारंभ असो वा इतर कुठलाही कार्यक्रम महिलांना सजणे आवडतेच. या शृंगारातील नथ हा एक आकर्षक दागिना. पिवळ्याधम्म साडीत नाकातील नथीने ललनेचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. नथ सुशोभित करण्यासाठी मोत्यांसोबत पाचू ,माणिक ही रत्नेही वापरली जातात. नक्कीच अनेक प्रकार असून नथीने चेहरा उठावदार दिसतो. महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यातही महिला विविध आकर्षक नथी घालून नटतात. दोन वर्षांपूर्वी चित्रपट सृष्टीत नथीचा नखरा गाजला होता. आता हा ट्रेंड चित्रपटातील नसून लॉक डाऊन काळातील महिलांची स्वयंप्रेरणा बनला आहे. नागपूर येथील प्रसिद्ध  कवी ज्ञानेश वाकुडकर यांच्या गाजलेल्या 'सखे साजणी' कवितेतील नथीवरील काव्य ओळी तिचे महत्त्व अधोरेखित करतात. कवी साजणीला आर्जवाने म्हणतात....
" नथ काढू नको गडे
 तिच्या दर्शनाविना
 श्वास सरकेना पुढे "

सविस्तर वाचा - वेळ रात्री अकराची...युवतीसोबत रस्त्यावर बोलत होता पोलिस कर्मचारी...मग काय झाले वाचा...
एकीकडे 'नथीचा नखरा' सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असला तरी दुसरीकडे कोरोनाच्या संकटामुळे पायपीट करणाऱ्या मजूर महिलांचे रक्ताळलेले पाय मीडीयात वेदनांचा अंगार मांडत आहे. त्यामुळे सहाजिकच 'नथीचा नखरा'वर मिम्स बनवून खिल्लीही उडविली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nathicha nakhara! New trend on social media