नाथपंथींच्या हत्येवरून सरकारवर ताशेरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

नागपूर - धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेवरून नाथपंथी डवरी समाजातील पाच जणांच्या हत्येवरून विधान परिषदेत विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. अफवा पसरविणाऱ्यांची फॅक्‍टरी कुणाची? असा सवाल करीत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी थेट भाजपवर प्रहार केला. संतप्त सदस्यांनी चर्चेदरम्यान सोशल मीडियांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली.

कपिल पाटील यांनी या घटनेसंदर्भात उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी व विरोधक दोघांनीही सोशल मीडियावरील नियंत्रणासाठी सरकारने पावले उचलण्याची मागणी केली. सुनील तटकरे यांनी भीमा-कोरेगावच्या घटनेपासून अशा घटना वाढत असल्याचे नमूद करीत सरकारने भटक्‍या जमाती, सोशितांसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सरकार जातीय उन्माद निर्माण करीत असल्याचा आरोप केला. जाणीवपूर्वक अफवा पसरवून पाच जणांची हत्या करण्यात आल्याचे ते म्हणाले.

विद्या चव्हाण यांनी भिडे गुरुजींना संरक्षणाचा थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केला. जनतेचा मुख्यमंत्र्यांवरील विश्‍वास नाहीसा होत असल्याचे त्या म्हणाल्या. हेमंत टकले यांनी हिंसाचाराच्या प्रवृत्तीत वाढ होत असल्याचे सांगितले. सत्ताधारी भाजपचे सुरेश धस यांनी फेक अकाऊंटवरून अफवा पसरविणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाईची मागणी केली. पोलिसांपुढे पाच लोकांना ठार मारले गेले. अशा पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी विनायक मेटे यांनी केली. सोशल मीडियाच्या नियंत्रणासाठी कायदा तयार करण्याची मागणी ऍड. राहुल नार्वेकर यांनी केली.

Web Title: nathpanthiy murder government jogendra kawade