टेकाडी - अवजड वाहनांमुळे महामार्गाला ‘पार्किंग झोन’चे आलेले स्वरूप.
टेकाडी - अवजड वाहनांमुळे महामार्गाला ‘पार्किंग झोन’चे आलेले स्वरूप.

महामार्ग पुन्हा ‘पार्किंग झोन’

टेकाडी - टेकाडी फाट्यापर्यंत होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या क्षेत्रातील काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आले असताना वाहनांच्या आवागमनात भर पडली आहे. क्षेत्रातील नागरिकांना मात्र आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सर्व्हिस रोडवर कोळसा ट्रकच्या अनधिकृत पार्किंगमुळे हा पेच निर्माण झाला आहे. नागरिकांसह ग्रामपंचायत प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रारींचा पाढा वाचूनदेखील थातूरमातूर कारवाई होत असल्याने स्थानिक जनता आता उद्रेकाचा मार्ग वापरायच्या मार्गावर असल्याचे चित्र परिसरात स्पष्ट आहे.

खाणीतून निघणारा कोळसा ट्रकच्या माध्यमाने नियोजित ठिकाणांवर पोहोचता केला जातो. याच कोळसा ट्रकचे संचालक रात्रीला ट्रक पार्क करण्यासाठी महामार्गाच्या सर्व्हिस रोडचा वापर पोलिसांच्या कारवाईला न जुमानता करतात. रात्रीला महामार्गावर अंधारात जडवाहनांमुळे अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. दिवसा ट्रकच्या टायर दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात सर्व्हिस रोडचाच वापर केला जातो. नवनिर्मित रस्त्यावर कोळसा टिप्परने टेकाडी, कांद्री, गोंडेगाव, कन्हान या परिसरातील बरेच बळी घेतले आहेत. दुचाकी व पायदळ चालणाऱ्यांसाठी महामार्गावर सर्व्हिस रोड बनविण्यात आले आहे. मात्र, जडवाहनांच्या बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विळख्यात सर्व्हिस रोड अडकल्याने इतर वाहतूकदार असुरक्षित झाले आहेत. 

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी ईश्‍वर कातकडे, विद्यमान ठाणेदार चंद्रकांत काळे यांच्याकडे अवैध पार्किंग झोनविरोधात तक्रार केली होती. काही दिवस कारवाईच्या भीतीनंतर कन्हान पोलिसांच्या कारवाईला न भिण्याचे टेंडर ट्रकचालक, संचालकांनी भरले की काय, हा पेंच सध्या निर्माण झालेला आहे.

अवैध पार्किंगसंदर्भात ठाणेदारांशी वारंवार बोलणे झालेले असून पत्रव्यवहारदेखील केलेला आहे. कायमचा बंदोबस्त लावण्यासाठी ठाणेदारांकडून नागपूर ग्रामीण आरटीओकडे तक्रार करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तक्रार आरटीओलाच करायची. मग कन्हान पोलिस कशासाठी, हा प्रश्‍न पडलेला आहे.
- सुनीता मेश्राम, सरपंच, टेकाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com