आंबा घ्या आंबा, गोड-रसाळ आंबा...नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याची चवच न्यारी

mangoes.jpg
mangoes.jpg
Updated on

अकोला : उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जायचे झाडावरील शाखा (पाडाला पिकलेले) आंबे दगड मारून पाडायच्या आणि यथेच्छ ताव मारायचा; पण आता कोरोनामुळे मामाच्या गावाला जाणं दूरच. चांगला नैसर्गिकरीत्या पिकविलेला आंबा खायला मिळाला तरी खूप झाले, अशी म्हणायची वेळ आली आहे.

जिल्ह्यात यंदा आंबा उत्पादन नसल्यातच जमा आहे. तरीसुद्धा बाजारामध्ये पिवळाधमक केसर, बदाम, हापूस, कलमी आंबा विक्रीला आलेला असून, शंभर रुपये किलो ते 3500 रुपये पेटी या दराने या आंब्याची जोरात विक्री सुरू आहे. परंतु आकर्षक, पिवळाधमक दिसणारा हा आंबा खायला गेले, की बऱ्याच प्रमाणात आंबट, स्वाद नसणे असे प्रकार होतात. त्याला कारण म्हणजे बाजारात मिळणारा सर्वच आंबा नैसर्गिकरीत्या पिकविलेला असेल असे नाही. शिवाय कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकविलेल्या आंब्याची पारख करता येणे गरजेचे आहे.

नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा कसा ओळखाल?
आंबा लवकर बाजारात आणण्याच्या हव्यासापोटी कोवळी फळे उतरविली जातात. लवकर माल विकून नफा कमाविण्यासाठी व्यापारी ते कार्बाईडमध्ये पिकवून ग्राहकांच्या माथी मारतात. यासाठी नैसर्गिकरीत्या पिकविलेला आंबा ओळखता आला पाहिजे. तज्ज्ञांच्या मते आंब्याच्या देठाभोवतालचा भाग (खांदे) वर आलेला असावा किंवा देठाच्या बरोबर असलेले तरी असावा. असे आंबे झाडावर तयार झाल्यानंतरच काढलेले असतात. मात्र, देठ वर व दोन्ही बाजूंनी उतार असल्यास, असे आंबे कोवळेच काढलेले असून, ते खराब होण्याची शक्यता अधिक असते. नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या आंब्यांना कार्बाईडने पिकविलेल्या आंब्यासारखा पिवळा चकचकीत आकर्षक रंग येत नाही. तो मळकट दिसतो. असा आंबा नाकाजवळ धरल्यास घमघमाट येतो. आंबा दाबला असता नरम वाटतो. घरामध्ये आंबे ठेवल्यास सर्वत्र आंब्याचा सुगंध दरवळतो.

कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा कसा ओळखावा?
कृत्रिमरीत्या कार्बाईडमध्ये पिकविलेले आंबे दिसायला आकर्षक पिवळे दिसतात, त्याला दाबल्यानंतर सहजासहजी ते दबत नाहीत. कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा नाकाजवळ धरला तर, त्याचा घमघमाट येण्याऐवजी उग्र वास येतो आणि स्वादिष्ट नसतात म्हणजे त्यात गोडवा आलेला नसतो, आंबट लागतात. रस केला तर त्यात साखर टाकावी लागते.

घरीही पिकवू शकतो
कृत्रिम आंबे खाणे टाळण्यासाठी दुसराही पर्याय आहे तो म्हणजे कच्चे आंबे आणून घरच्या घरी पिकविणे. त्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून किंवा बाजार समितीमधून हवा तेवढा कच्चा आंबा विकत आणावा. शहरी भागात गवतामध्ये किंवा उसाच्या पाचटामध्ये आंब्याची आडी लावणे (पिकायला ठेवणे) शक्य असेल तर तसे पिकवावे किंवा क्रेटमध्ये अथवा कागदी बॉक्समध्ये तीन थर आंबे ठेवावेत. प्रत्येक थराच्या मध्ये कागद ठेवावा. आंब्यातून इथिलिन गॅस निघतो. तेव्हा एका आंब्याचा गॅस दुसऱ्या आंब्याला लागतो आणि आंबा अतिशय चांगले नैसर्गिकरित्या पिकतात. याशिवाय दुसऱ्या प्रकारात आंबे पिकविण्यासाठी इथरेलचा वापरही फायदेशी ठरतो. प्रतिलिटर पाण्यात दीड एमएल इथरेल टाकून त्यात दहा मिनिटे आंबे त्यात बुडवावे आणि नंतर ते पिकायला ठेवावेत. त्यात अतिशय चांगला गोडवा येत असल्याचे फळबाग तज्ज्ञ सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com