चंद्रपुरातील मनपाच्या नाट्यगृहाला का लागले कुलूप...नाट्यप्रेमींचा हिरमोड

file photo
file photo

चंद्रपूर : शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा जपण्यासाठी तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला. 1990 मध्ये नाट्य सभागृह बांधले. त्यावर सुमारे 40 ते 45 लाखांचा खर्च केला. सुमारे 750 आसनाची तेथे व्यवस्था आहे. नाट्य कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हाच मुख्य उद्देश होता.

मात्र, आजघडीला हे सभागृह असुविधेचे केंद्र बनले आहे.
येथे पार्किंगची व्यवस्था नाही. बोटावर मोजण्याएवढे कार्यक्रम झालेत. त्यानंतर तब्बल 30 वर्षांपासून हे सभागृह कुलूपबंद आहे.

1990 मध्ये नगरपालिका प्रशासनाने सातमजली इमारतीच्या बाजूला नेताजी भवनाचे बांधकाम केले. या भवनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या माळ्यावर नाट्यगृह आहे. 1992 च्या काळात या सभागृहाचे उद्‌घाटन करण्यात आले. शहरातील नाट्य कलावंतांना तालीम करता यावी, नाटकाचे प्रयोग व्हावे, हा या मागील उद्देश होता. मात्र, बांधकामापासूनच ही इमारत वादाच्या भोवऱ्यात सापडली. सभागृहातील खुर्च्यांचा घोटाळा त्या काळात चांगलाच चर्चेत राहिला होता.

या सभागृहाला मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त अन्य सुविधा नाही. अनुचित घटना घडल्यास बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नाही. स्वच्छतागृहाची सुविधा नाही. त्यामुळे या सभागृहात बोटावर मोजता येतील, एवढेच कार्यक्रम झाले. त्यानंतर हे सभागृह कुलूपबंद झाले. आजघडीला सभागृह परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सभागृहातील साहित्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे लाखोंचा खर्च व्यर्थ गेल्याची चर्चा नाट्यप्रेमींमध्ये आहे.

नाट्यप्रेमींनी केली होती साफसफाई

महानगरपालिकेच्या आमसभेत चार-पाच वर्षांअगोदर सभागृहाच्या नूतनीकरणाचा विषय आला होता. मात्र, पार्किंगची व्यवस्था नसल्याने खर्च वाया जाईल, या भीतीने हा प्रस्ताव बारगळला. माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही विधानसभेत सभागृहाची लक्षवेधी लावली होती. परंतु, त्यानंतर काहीच झाले नाही. काही वर्षांअगोदर शहरातील नाट्यप्रेमींनी सभागृहाची साफसफाई करीत नाटकाच्या तालीम सुरू केल्या होत्या. परंतु, येथील असुविधेला कंटाळून नाट्यप्रेमींनी त्याकडे पाठ फिरविली आहे.

असुविधेचे केंद्र बनले
नाट्य कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबत सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशातून नेताजी भवन हे नाट्यगृह बांधण्यात आले. मात्र, ही इमारत असुविधेचे केंद्र बनले आहे. त्यामुळे मागील 30 वर्षांपासून सभागृह कुलूपबंद आहे. सभागृहावरील लाखोंचा खर्च वाया गेला आहे.
- संजय वैद्य, माजी नगरसेवक, चंद्रपूर.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com