मध्यरात्री पंधरा-वीस सशस्त्र नक्षलवादी घरात घुसले आणि...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

कोणाचेही काही ऐकून न घेता नक्षली त्याला घेऊन गेले. आज सकाळी नातेवाईकांना रवि पुंगाटी यांचा मृतदेहच आढळून आला.

एटापल्ली(जि.गडचिरोली) : गडचिरोली जिल्हा म्हणजे नक्षलवादी कारवायांचा गड. आदिवासींच्या वसाहतीचा प्रदेश. यीेल आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि या क्षेत्राच्या विकासासाठी, येथील नक्षलवादी कारवाया थांबवण्यासाठी सरकार आणि अनेक समाजसेवी संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना बरेचसे यशही मिळाले असले तरी अजूनही हा प्रदेश नक्षलमुक्‍त झालेला नाही. पोलिसांवर जीवघेणे हल्ले किंवा पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून एखाद्याची नृशंस हत्या असे प्रकार इथे अधूनमधून घडतच असतात. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नुकतीच एका तरुण शेतकऱ्याची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे.

सविस्तर वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन...

एटापल्ली तालुक्‍यातील गट्टा पोलिस स्टेशन हद्दीतील गुडंजूर येथील रवि झुरु पुंगाटी (वय 28 ) या युवकाची पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी हत्या केली आहे. रवि पुंगाटी हा शेतकरी असून गुरुवारी (ता.11) रात्री तो त्याच्या घरी झोपला असताना मध्यरात्री 15 ते 20 शस्त्रधारी नक्षली त्याच्या घरात घुसले. रवीला झोपेतुन उठवून ते त्याला गावाच्या बाहेर घेऊन गेले, रवीच्या नातेवाईकांनी त्याला सोडून देण्याची विनवणी केली मात्र ,कोणाचेही काही ऐकून न घेता नक्षली त्याला घेऊन गेले. आज सकाळी नातेवाईकांना रवि पुंगाटी यांचा मृतदेहच आढळून आला. घटनेच्या माहितीवरून गट्टा पोलिसांनी नक्षल विरोधी शोध मोहीम सुरू केली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxali killed youth farmer in Gadchiroli district