विदर्भ : नक्षलवाद्यांचा पुन्हा धुडगूस; जाळपोळीत मोठे नुकसान

एटापल्ली - नक्षलवाद्यांनी रस्त्यावर रविवारी असे बॅनर लावली होती.
एटापल्ली - नक्षलवाद्यांनी रस्त्यावर रविवारी असे बॅनर लावली होती.

कोरची, भामरागड, एटापल्लीत धुडगूस
एटापल्ली (ता. गडचिरोली) - नक्षलवाद्यांनी रविवारी (ता.१९) पुकारलेल्या बंदमुळे कोरची, भामरागड व एटापल्ली या तालुक्‍यांतील जनजीवनाला मोठा फटका बसला.

तीन ठिकाणी तालुका मुख्यालयातही बाजारपेठ पूर्णत: बंद होती. याशिवाय दुर्गम भागांत मुख्य रस्त्यावर झाडे तोडून बॅनर लावल्याने वाहतूक सेवाही विस्कळित झाली होती. दरम्यान, आज दुपारी गुरुपल्ली गावालगत नक्षलवाद्यांनी लाकूड बिटाला आग लावली. यात वन विभागाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.

नक्षलवाद्यांनी गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात धुडगूस घातला आहे. जाळपोळ, पत्रके, बॅनर तसेच रस्त्यावर झाडे तोडून टाकल्याने दुर्गम भागातील वाहतूक ठप्प झाली होती. भरदुपारी नक्षलवाद्यांनी एटापल्ली येथील पोलिस ठाण्यापासून एक किलोमीटर अंतरावर एटापल्ली टोळी येथे बॅनर लावले. एटापल्ली तालुक्‍यातील गुरुपल्लीपासून काही अंतरावर नक्षल्यांनी काही दिवसांपूर्वी जाळपोळ केलेल्या एका ट्रकजवळ झाडे तोडून टाकली. त्यानंतर बॅनर बांधून वाहतूक सेवा बंद पाडली. भामरागडजवळील पर्लकोटा नदीजवळही बॅनर बांधले. या बॅनरवर २७ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीचा उल्लेख केला आहे. नक्षली कमांडर रामको नरोटे आणि शिल्पा धुर्वा यांना गुंडूरवाही येथे बनावट चकमक दाखवून ‘सी- ६०’ पथकाने ठार केल्याचे बॅनरवर नमूद करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या भीतीने पोलिस ठाणे असलेल्या कोरची, भामरागड तसेच एटापल्ली येथील बाजारपेठ पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. जिल्ह्याच्या अनेक भागात बंदमुळे तेंदूपत्ता तोडण्याचे काम ठप्प झाले होते. यामुळे मजुरांचे हजारो रुपयाचे नुकसान झाले. 

गावकऱ्यांनी जाळले बॅनर
नक्षलवाद्यांच्या बंदचा विरोध करीत अनेक गावांत नागरिकांनी नक्षलवाद्यांनी बांधलेल्या बॅनरची जाळपोळ करून निषेध व्यक्त केला. सरकारी मालमत्तेची जाळपोळ करू नये, आदिवासींची हत्या थांबवावी, रस्त्यांच्या कामात अडथळा येऊ देऊ नये, विकासकामात सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com