पळालेल्या नक्षलवाद्यांचा शाळेत मुक्काम

सुरेश नगराळे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

गडचिरोली - भीषण चकमकीतून बचावलेल्या नक्षलवाद्यांनी चक्क पोलिस ठाण्यालगत असलेल्या आश्रमशाळेत रात्रभर आश्रय घेऊन आपला जीव वाचविल्याचे उघडकीस आले आहे. अहेरी तालुक्‍यातील पेरमिली येथील आश्रमशाळेत नक्षलवाद्यांनी सोमवारी (23 एप्रिल) रात्री आसरा घेतला होता. भीतीपोटी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या नक्षलवाद्यांना जेवणही बनवून दिले. ही माहिती दडवून ठेवल्याबद्दल पोलिसांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

भामरागड तालुक्‍यातील बोरिया गावालगतच्या जंगल परिसरात रविवारी (22 एप्रिल) झालेल्या चकमकीत 33 नक्षलवादी ठार झाले होते. या दरम्यान सोमवारी रात्री नक्षलवाद्यांच्या या गटाची पोलिसांसोबत चकमक झाली व त्यात सहा नक्षलवादी ठार झाले होते. यातून बचावलेल्या सात नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला. ते तेथून पेरमिली येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत मध्यरात्रीच्या सुमारास पोचले. तेथे उपस्थित अधीक्षक व कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून नक्षलवाद्यांनी जेवण बनविण्यास सांगितले. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी जेवण बनवून दिले. मंगळवारी (24 एप्रिल) पहाटे चारच्या सुमारास नक्षलवादी जंगलात पसार झाले. विशेष म्हणजे या आश्रमशाळेच्या मागच्या बाजूलाच पोलिस ठाणे असून वस्तीही लागूनच आहे.

दुसऱ्या दिवशी या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून विचारपूस केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. पळून गेलेल्या नक्षलवाद्यांच्या शोधण्यासाठी "सी-60' पथक व "सीआरपीएफ'च्या जवानांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे.

साईनाथची शाळा
पेरिमिलीच्या ज्या शासकीय आश्रमशाळेत नक्षलवादी थांबले होते, त्याच शाळेत चकमकीत ठार झालेले पेरमिली दलम कमांडर साईनाथ व अहेरी दलम कमांडर वासुदेव या दोघांनीही शिक्षण घेतले होते. साईनाथ रविवारच्या, तर वासुदेव सोमवारच्या चकमकीत ठार झाला होता. अतिसंवेदनशील म्हणून ओळख असलेल्या पेरमिलीत नक्षलवाद्यांनी याअगोदर दोन वेळा शक्तिशाली स्फोट घडवून आणले असून, त्यात चार अधिकारी हुतात्मा झाले होते.

Web Title: naxalite school residence