हिंसक नक्षलवाद्यांना उपरती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

गेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती
गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. यात सर्वाधिक गडचिरोली जिल्ह्यातील 596 जणांचा समावेश असल्याची माहिती नक्षलवादविरोधी अभियानाने दिली आहे.

गेल्या 13 वर्षांत 615 जणांची शरणागती
गडचिरोली - राज्यभरात गेल्या 13 वर्षांत 615 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. यात सर्वाधिक गडचिरोली जिल्ह्यातील 596 जणांचा समावेश असल्याची माहिती नक्षलवादविरोधी अभियानाने दिली आहे.

राज्य सरकारने 29 ऑगस्ट 2005 पासून आत्मसमर्पण योजना सुरू केली. 25 सप्टेंबर 2005 रोजी दलम सदस्य असलेला जहाल नक्षलवादी मदनअय्या ऊर्फ बालना बलय्या याच्या शरणागतीने योजनेला पहिले यश प्राप्त झाले.

आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून 2005 ते जून 2018 या कालावधीत गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांतील 615 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. त्यात केवळ गडचिरोली जिल्ह्यातील 596, तर गोंदिया जिल्ह्यातील 17 व चंद्रपूर जिल्ह्यातील दोन नक्षलवाद्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात 77 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करून नवजीवनाची वाट धरली. त्यात गडचिरोलीतील 67 व गोंदिया येथील दहा नक्षलवाद्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 17 नक्षलवादी शरण आले. तिसऱ्या टप्प्यात 75 जणांनी शरणागती पत्करली. यात गोंदियातील एका नक्षलवाद्याचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात 133 नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला.

पाचव्या टप्प्यात दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य रैना ऊर्फ रघू ऊर्फ जालमलाय लालुसाय सडमेक याच्यासह 30 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यात गडचिरोलीतील 28 व गोंदिया येथील दोघांचा समावेश आहे. सहाव्या टप्प्यात 15 नक्षलवादी शरण आले, तर सातव्या टप्प्यात 21 जणांनी शांततेचा मार्ग स्वीकारला. आठव्या टप्प्यात 12 नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला. शरणागती स्वीकारलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने घेतल्याने याला चांगला प्रतिसाद मिळाला.

सध्या नक्षलवादी मोठ्या प्रमाणात शरणागतीचा मार्ग स्वीकारत आहेत. शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत व इतर लाभ त्यांना देण्यात येतात. त्यामुळे जंगलातील इतर नक्षलवाद्यांनी शरणागतीचा मार्ग स्वीकारून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे.
- शरद शेलार, विशेष पोलिस महानिरीक्षक, नक्षलवादीविरोधी अभियान, नागपूर

Web Title: Naxalite surrender crime