esakal | चकमकीत ठार नक्षलवाद्यांवर होते १८ लाखांचे बक्षीस 
sakal

बोलून बातमी शोधा

Naxal

रविवारच्या चकमकीत ठार झालेल्या पाचही नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.

चकमकीत ठार नक्षलवाद्यांवर होते १८ लाखांचे बक्षीस 

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : धानोरा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील किसनेली जंगल परिसरात पोलिसांच्या सी ६० जवानांनी रविवारी (ता. १८) ठार केलेल्या पाच नक्षलवाद्यांवर एकूण १८ लाख रुपयांचे बक्षीस सरकारने जाहीर केले होते, अशी माहिती पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सोमवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक गोयल म्हणाले की, रविवारच्या चकमकीत ठार झालेल्या पाचही नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. या मृत नक्षलवाद्यांमध्ये समीता उर्फ राजो किरको (वय ३४) ही मूळची गडचिरोली जिल्ह्यातील मुंगनेर (ता. धानोरा) येथील रहिवासी असून ती प्लाटून क्रमांक १५ ची सदस्य होती. यापूर्वी ती प्लाटून क्र. २०, पोटेगाव दलमचीही सदस्य होती. तिच्यावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात २ खून, ९ चकमकी व इतर ३ असे १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सरकारने तिच्यावर ४ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

दुसरी मृत महिला नक्षली कुमली चिपळूराम गावडे (वय २३) हीसुद्धा धानोरा तालुक्यातीलच कटेझरी येथल रहिवसी असून ती कोरची दलम सदस्य होती. ती २०१६ पासून दलममध्ये असलेली कुमली काही काळ कुख्यात महिला नक्षली सृजनक्का हिची सुरक्षारक्षक म्हणूनही कार्यरत होती. तिच्यावर २ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सरकारने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

तिसरी मृत महिला नक्षली सुमन उर्फ झुनकी उर्फ सुलकी बुच्चा पदा (वय ३२) ही टिपागड दलममध्ये कार्यरत होती. ती मूळची एटापल्ली तालुक्यातील (जि. गडचिरोली) पिपली बुर्गी येथील राहणारी आहे. २००६ पासून ती दलममध्ये कार्यरत आहे. तिच्यावर १ खून, १४ चकमकी व इतर ६ असे एकूण २१ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर सरकारने ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

चौथी मृत महिला नक्षली चंदा उर्फ चंदना उर्फ मासे भालसे/भाकसे (वय २५) ही असून ती छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तीप्लाटून क्रमांक 15 ची सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर सरकारने ४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

मृत पुरुष नक्षल्याचे नाव टिरा उर्फ नीलेश उर्फ शिवाजी दारसू मडावी (वय ३०) असून तो धानोरा तालुक्यातीलच चिचोडा येथील रहिवासी आहे. तो टिपागड दलममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर ६ खून, ७ चकमकी व इतर ८ असे २० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सरकारने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

सख्या भावानेच केला भावाचा खून; जागा विकण्यावरून सुरू होता वाद

 
वर्षातील सर्वात मोठी कामगिरी 

आतापर्यंत एकूण १० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिस दलास यश मिळाले असून २०२० या वर्षातील गडचिरोली पोलिस दलाची ही सर्वांत मोठी कामगिरी आहे. पोलिसांनी ठार केलेल्या या सर्व पाच नक्षलवाद्यांवर सरकारने एकूण १८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. घटनास्थळावर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे व नक्षल साहित्य जप्त केल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले. 

मेळघाटचे दही, रबडी, खवा होणार ग्लोबल; पर्यटकांसाठी खास मेजवानी  
 

सी-६० कमांडोंचे कौतुक... 

या चकमकीत ५ नक्षलवाद्यांना सी-६० कमांडो पथकाने कंठस्नान घातल्याबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले आहे. तसेच नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचेही संकेत दिले आहेत. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर