शरद पवारांनी घडविलेले कार्यकर्ते भाजपने पळविले : अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

राज्य सरकारने गाडगेबाबा यांच्या नावाच्या योजनेचे नाव बदलेले. सरकार अदानी, अंबानी, रामदेवबाबा व उद्योगपतींचे सरकार आहे. कर्जमाफीबाबत विचारणाऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे. पेशव्यांनी या राज्याला वेठीस धरले आहे. राममंदिर बांधण्याच्या शिवसेना-भाजप फसव्या घोषणा देत आहेत, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

काटोल : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हेच तळागाळातून कार्यकर्ते घडवू शकतात, तर भाजप केवळ पवारांनी घडविलेले कार्यकर्ते फक्त पळवू शकतात, असा खोचक टोला अभिनेता व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला.

काटोल येथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपच्या मेगा भरतीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली.

काटोल येथे नवीन बाजार समितीच्या यार्डमध्ये आयोजित सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, रमेशचंद्र बंग, आमदार प्रकाश गजभिये, महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, अमोल मिटकरी, युवा अध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर, सतीश शिंदे, सलील देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी काटोल शहरात शिवस्वराज्य यात्रेचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले.
पेशव्यांनी राज्याला वेठीस धरले

राज्य सरकारने गाडगेबाबा यांच्या नावाच्या योजनेचे नाव बदलेले. सरकार अदानी, अंबानी, रामदेवबाबा व उद्योगपतींचे सरकार आहे. कर्जमाफीबाबत विचारणाऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे. पेशव्यांनी या राज्याला वेठीस धरले आहे. राममंदिर बांधण्याच्या शिवसेना-भाजप फसव्या घोषणा देत आहेत, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP amol kolhe criticize BJP at katol