विमा हवा, कापूस पावसात भिजू द्या! विमा कंपनी प्रतिनिधींचा शेतकऱ्यांना सल्ला 

नीलेश झाडे 
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

गोंडपिपरी तालुक्‍याला परतीचा पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शेकडो हेक्‍टरमधील धानपीक जमिनीवर लोळले आहे. हातात येणाऱ्या पिकाचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सरकार मदत करेल ही आस त्याला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. परंतु अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने झालेले नुकसान खरे पाहता नुकसानच नाही, असे विमा कंपनी म्हणते.

धाबा (जि. चंद्रपूर) : अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. परंतु विमा कंपनीच्या नजरेत हे नुकसानच नाही. उलट पीक काढणीनंतर हातात आलेल्या शेतमालाचे नुकसान झाले तरच विम्याचा लाभ मिळेल. लाभ हवा असेल तर वेचणी झालेला कापूस पावसात भिजू द्या, असा संतापजनक सल्ला विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना देत आहेत. 

गोंडपिपरी तालुक्‍याला परतीचा पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शेकडो हेक्‍टरमधील धानपीक जमिनीवर लोळले आहे. हातात येणाऱ्या पिकाचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सरकार मदत करेल ही आस त्याला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. परंतु अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने झालेले नुकसान खरे पाहता नुकसानच नाही, असे विमा कंपनी म्हणते.

गोंडपिपरी तालुक्‍यातील डोंगरगाव, अळेगाव येथील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचा अर्ज देण्यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे गेले असता रामटेके नामक प्रतिनिधीने अर्ज घेण्यास टाळाटाळ केली. कृषी सहायकाने "अर्ज घ्या' अशी विनंती केल्यावर त्या प्रतिनिधीने अर्ज स्वीकारले. हा प्रकार गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभागृहात घडला. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून कृषी सहायकांनी पीक नुकसानीचा अर्ज विमा प्रतिनिधीकडे देण्याच्या सूचना शेतकऱ्यांना केल्या. 1 नोव्हेंबरला गोंडपिपरी तहसीलदारांनी पिकांच्या नुकसानीसंदर्भात तातडीची सभा घेतली होती. या सभेत विमा प्रतिनिधी उपस्थित होता. डोंगरगाव, अळेगाव येथील शेतकऱ्यांनी गोंडपिपरी येथील पंचायत समितीचे सभागृह गाठले. विमा प्रतिनिधी रामटेके यांना अर्ज देण्यासाठी गेले असता त्यांनी अर्ज घेण्यास टाळाटाळ केली असे शेतकरी सांगतात. सभागृहात उपस्थित कृषी सहायकाने अर्ज घेऊन घ्या, असे सांगितल्यावर त्या प्रतिनिधीने अर्ज स्वीकारले.

अतिवृष्टी, परतीचा पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्यास विमाचा लाभ मिळत नाही. लाभ हवा असेल तर वेचणी झालेला कापूस पावसात भिजू द्या, असा सल्लाही त्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांना दिला. यावर शेतकरी चांगलेच संतापले. दरवर्षी पीक विमा आम्ही भरतो. मात्र, कधीच नुकसानभरपाई मिळाली नाही. या पीक विम्याचा काय उपयोग, असा संतप्त सवाल करीत शेतकऱ्यांनी प्रतिनिधीला धारेवर धरले. 

नुकसान कसे करायचे? 
पीक विमा हवा असेल तर वेचणी झालेला कापूस पावसात भिजू द्या, असा सल्ला विमा प्रतिनिधीने शेतकऱ्यांना दिला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतापले. हातात आलेल्या शेतमालाचे शेतकरी नुकसान करून घेईल काय, असा संतप्त सवाल त्यांनी प्रतिनिधीला केला. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, असे उपस्थितांचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need insurance, soak cotton in the rain! Insurance company representatives advise farmers