विद्यार्थी लेट, नीट ‘नीटनेटकी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) रविवारी (ता. ६) घेण्यात आलेल्या नीट परीक्षेसाठी सकाळी साडेनऊच्या आत परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही विविध केंद्रांवर बरेच विद्यार्थी उशिरा पोहचले. दरम्यान मंडळाकडून प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या भरगच्च नियमांच्या त्रास विद्यार्थ्यांना झाला. मात्र, एकंदरीत परीक्षेदरम्यान कुठलाही गोंधळ झाला नसल्याने शहरात घेण्यात आलेली यंदाची ‘नीट’ शांततेत पार पडली. याशिवाय पेपर सोपा आल्याने विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला. 

नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) रविवारी (ता. ६) घेण्यात आलेल्या नीट परीक्षेसाठी सकाळी साडेनऊच्या आत परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही विविध केंद्रांवर बरेच विद्यार्थी उशिरा पोहचले. दरम्यान मंडळाकडून प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या भरगच्च नियमांच्या त्रास विद्यार्थ्यांना झाला. मात्र, एकंदरीत परीक्षेदरम्यान कुठलाही गोंधळ झाला नसल्याने शहरात घेण्यात आलेली यंदाची ‘नीट’ शांततेत पार पडली. याशिवाय पेपर सोपा आल्याने विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला. 

जिल्ह्यासह शहरातील ४९ केंद्रांवर सीबीएसईद्वारे ‘नॅशनल इलिजिबिलीटि कम इंटरन्स टेस्ट’चे (नीट) आयोजन करण्यात आले होते. यासाठी सकाळी साडेसात ते साडेनऊदरम्यान केंद्रांवर विद्यार्थ्यांना पोहचायचे होते. नागपूर शहरात छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विभागाच्या सहा जिल्ह्यांतील वीस हजारांवर विद्यार्थ्यांचा समावेश होता. सकाळी आठ वाजतापासूनच केंद्रावर पालक आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. प्रवेशपत्रावर दिलेल्या नियमानुसार केंद्राबाहेरच विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती. यानंतरही मुली केसात पिन, कान व नाकातील रिंग आणि गळ्यात चेन घालून येताना दिसत होत्या. शिवाय बरेच विद्यार्थी बेल्ट आणि पाकीट घेऊन आत शिरण्याच्या प्रयत्नात होते. केंद्रावरील अधिकारी त्यांना वारंवार सूचना देत असल्यावरही विद्यार्थी आणि पालक त्यांच्याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून आले. सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य पालकांजवळ ठेवून केंद्रामध्ये सोडण्यात आले. मात्र, यावेळी कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात होता.  

उशिरा येणाऱ्यांना बाहेरचा रस्ता
श्रीकृष्णनगरातील भवन्स विद्यामंदिर आणि सरस्वती विद्यालय या परीक्षा केंद्रांवर चार ते पाच विद्यार्थी उशिरा आले. या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. शहरातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर साडेसात वाजतापासून प्रत्येक मिनिटा मिनिटाची माहिती देण्यात आली. शेवटची दोन मिनिटे बाकी असतानाही बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या. असे असतानाही काही विद्यार्थी उशिरा आल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

ऑटोचालकाची दिलदारी
नीटसाठी आलेल्या श्रेयश डोईजड नावाच्या विद्यार्थ्याला ऑटोचालकाने एका परीक्षा केंद्रावर सोडले. मात्र, परीक्षेच्या घाईने श्रेयश आपली बॅग ऑटोत विसरला. परीक्षेचे प्रवेशपत्रही या बॅगमध्ये असल्याने श्रेयश कावराबावरा झाला. दोन वर्षांची मेहनत वाया जाणार या भीतीने परीक्षा केंद्रातच तो रडायला लागला. पण, ऑटोचालकानेही यावेळी समयसूचकता दाखविली. काही दूर गेल्यावर ही बाब ऑटोचालकाच्या ध्यानात आली. त्याने रस्त्यात मिळालेल्या मनोहर मानकर या व्यक्तीला परीक्षार्थी ऑटोत बॅग विसरल्याचे सांगितले. त्यांनी बॅग तपासून त्यात मिळालेल्या नातेवाईकांच्या मोबाईल नंबरवरून श्रेयशचा नंबर मिळविला आणि शेवटी परीक्षा केंद्रावर त्याला त्याची बॅग नेऊन दिली. ऑटोचालकाच्या समयसूचकतेमुळे अखेर श्रेयशला प्रवेशपत्र मिळाले व वेळेत परीक्षेला बसू शकला.  

क्‍लिप, जोडवेही काढले
गतवर्षीप्रमाणेच यंदाही काटेकोर नियमांची यादीच सीबीएसईने दिली होती. तरी विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केल्याने परीक्षा केंद्रामध्ये जाताना त्यांना नियमांचा फटका बसला. कानातील रिंगपासून तर गळ्यातील चेन आणि क्‍लिपसुद्धा काढून अनेक मुलींना परीक्षा द्यावी लागली. अनेकांना हातातील धागेदोरे, घड्याळ, ब्रेसलेट काढून ठेवाव्या लागल्या. एवढेच नव्हे तर मुलींच्या टी-शर्टवरील ‘शो’ची बटन बेल्ट कटरद्वारे कापण्यात येत होती. आतमध्ये कानात कुठला डिवाईस आहे काय. याचाही शोध टॉर्चद्वारे घेण्यात येत होता. विशेष म्हणजे केंद्रावर जोडे, बो आणि क्‍लिपचा खच दिसून येत होता.

अर्धा तास उशिरा दिला पेपर 
परीक्षेदरम्यान एका केंद्रावर अर्धा तास उशिरा पेपर सोडविण्यासाठी दिल्याची माहिती समोर आली. सकाळी साडेनऊ वाजता केंद्रावर रिपोर्टिंग केल्यानंतर ९.५५ ला पेपर देणे आणि दहा वाजता सोडविण्यास सुरुवात करायची होती. मात्र, शहरातील एका नामांकित शाळेतील केंद्रावर एका पर्यवेक्षकाने साडेदहा वाजेपर्यंत पेपर सोडवूच दिला नसल्याचे कळते. विशेष म्हणजे यानंतर अर्धा तास अधिक देणे आवश्‍यक असताना, तुमचे पेपर फाडून टाकू अशी धमकी देऊन विद्यार्थ्यांकडून पेपर घेण्यात आल्याचे कळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घाईत पेपर सोडवावा लागला. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फटकाही बसला. त्यामुळे पेपरमधील बरेच प्रश्‍न सुटल्याचे आढळून आले. पालकांनी याप्रकरणी रोष व्यक्त केला.

Web Title: NEET exam student education