विदर्भ : नव्या चेहऱ्यांनी दिग्गजांना दाखवले अस्मान | Election Results 2019

File photo
File photo

नागपूर : विदर्भात अनेक धक्‍कादायक निकाल लागले आहेत. कॉंग्रेस, भाजपच्या उमेदवारांनी दिग्गजांना पराभूत केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा पराभव राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे. मनोहर चंद्रिकापुरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असून, किसान आघाडीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे शिक्षण कृषीमध्ये बीएस्सी आहे. शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. तर, गोंदिया मतदारसंघातील भाजपचे गोपालदास अग्रवाल यांचा विनोद अग्रवाल यांनी दारुण पराभव केला आहे. विनोद अग्रवाल यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. 1987 पासून भारतीय जनता पक्षात कार्यरत, 1989 चोपा जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रमुख, 2003 ला भाजपचे जिल्हा महामंत्री, 2013 ला जिल्हाध्यक्ष भाजप, 2000 ला जिल्हा परिषद सदस्य, युवा मोर्चा अध्यक्ष यासह अन्य महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी 2019ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला होता. आमगाव मतदारसंघातून कॉंग्रेसकडून सहसराम कोरोटे हे विजयी झाले आहेत. त्यांचा व्यवसाय शेती असून, 2001 ते 2014 पर्यंत जनवादी अधिकार परिषदेत कार्यरत होते. 2015 मध्ये कॉंग्रेस पक्षात प्रवेश. 2019 मध्ये कॉंग्रेसकडून उमेदवारी आणि ते विजयी झाले. त्यांनी भाजपचे पुराम यांचा पराभव केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नाईक घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक यांनी आमदार नीलय नाईक या चुलत भावाचा पराभव केला आहे. इंद्रनील नाईक हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले. पुसद येथील शैक्षणिक संस्थांचे संचालक आहेत. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा मतदारसंघातून विजय मिळविला आहे. प्रतिभा धानोरकर यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्या कॉंग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. बचतगटामध्ये त्या सक्रिय आहेत. चंद्रपूर येथून किशोर जोरगेवार विजयी झाले आहेत. अपक्ष म्हणून त्यांनी हा विजयी संपादन केला आहे. ते बुरुड समाज संघटनेचे सदस्य असून, त्यांनी यंग चांदा ब्रिगेड नावाची संघटना स्थापन केली आहे. तुमसरमधून राष्ट्रवारी कॉंग्रेसचे राजू कारेमोरे विजयी झाले आहेत. ते वरठी येथील उद्योगपती असून, भंडारा जिल्हा राइस मिल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांच्याकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना संभाव्य बदलाबाबत मार्गदर्शन करून मालाच्या विक्रीसाठी नेहमी सहकार्य मिळते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते असून, जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांची गणना होते. अमरावती येथून सुलभा खोडके (कॉंग्रेस) यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी आमदार सुनील देशमुख यांचा पराभव केला आहे. 2004 पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्य बनत राजकीय कारकीर्द प्रारंभ. बडनेरा मतदारसंघातून त्यांनी 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला. मराठी व राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण झालेल्या सुलभा खोडके आमदार बनण्यापूर्वी महिला सहकारी बॅंकेच्या अध्यक्षाही होत्या. महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे. सिद्धिविनायक महिला बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी शहरी व ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली. सोबतच महिलांना उद्योगाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करून दिली. दरवर्षी स्व. प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमासोबतच गार्डन क्‍लबचे आयोजन वैशिष्ट्य ठरले आहे. 2009 व 2014 मध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी या वेळी बडनेराऐवजी अमरावती मतदारसंघाची निवड केली. त्या कॉंग्रेसच्या उमेदवार आहेत.
दर्यापूर येथून कॉंग्रेसचे बळवंत वानखडे विजयी झाले आहेत. रिपाइंचे (गवई) बळवंत वानखडे यांची चळवळीतील कार्यकर्ता, अशी ओळख असून ते पदवीधर आहेत. सहकार क्षेत्रातून त्यांनी राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. रिपाइंतून बाहेर पडून ते कॉंग्रेसकडून निवडणूक रिंगणात आले. दांडगा जनसंपर्क असून प्रतिमा शालीन आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी दोनवेळा दर्यापूर मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. सध्या ते जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती आहेत.
धामणगाव रेल्वेमधून प्रताप अडसड यांनी विजय मिळविला आहे. भाजपचे धामणगाव रेल्वे नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. पदव्युत्तर शिक्षण झालेले प्रताप अडसड विधान परिषद सदस्य अरुण अडसड यांचे पुत्र असून भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. घरातूनच राजकीय वारसा लाभला. प्रथमच विधानसभा निवडणूक लढवीत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार विजयी झाले आहेत. त्यांनी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला आहे. शेतकऱ्यांचा नेता, अशी मतदारसंघात ओळख असलेले देवेंद्र भुयार पदवीधर आहेत. जरुड सर्कलमधून जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या भुयार यांचा शेतकरी चळवळीत मोठा सहभाग राहिला आहे. विधानसभा निवडणुकीस प्रथमच समोर जात आहेत. ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आहे. आक्रमक नेता अशी ओळख असून ते जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com