मटण महागले चिंता नको... मदतीला धावली अंडी 

file photo
file photo

नागपूर : कोल्हापुरात मटणाचे दर सहाशे रुपये किलोवर गेले आहेत. थंडीच्या दिवसात मागणी वाढून अंड्याचे दरही वाढतात. यावर्षी मात्र थंडीची तीव्रता वाढली असली, तरी अंडीचे दर खाली आल्याने उत्पादकांना घाम फुटला आहे. शासनाने या विषयात हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांची असून, यासंदर्भाने लवकरच एक शिष्टमंडळ सत्ताधाऱ्यांना भेटणार आहे. 

राज्यात इतर ऋतूंऐवजी हिवाळ्यात अंड्यांना सर्वाधिक मागणी वाढते. त्यामुळे दरातही तेजी येते, असा दर वर्षीचा पोल्ट्री उद्योगाचा अनुभव आहे. या वर्षी दरात तेजी येण्याऐवजी उत्पादकता खर्चाची भरपाईच अशक्‍य झाल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत. शेकडा (100 नगामागे) सरासरी 60 रुपयांची घसरण झाल्याचे सांगण्यात आले. थंडीपूर्वी राज्यात अंड्याचे दर 519 रुपये शेकडा होते. ते आता 460 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. 

हैदराबाद मार्केटचे दर 455 वरून 405 पर्यंत खाली आले आहेत, असेही पोल्ट्री व्यावसायिक क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. राज्याची रोजची अंड्यांची मागणी 2 कोटी नगांची आहे. यातील 1 कोटी 20 लाख अंड्यांचे उत्पादन महाराष्ट्रात होते. अंडी उत्पादनात सरासरी 80 लाखांचा वाटा पुणे जिल्ह्याचा आहे. दहा लाख अंडी उत्पादन विदर्भातील अमरावती जिल्ह्यात, तर दोन लाखांवर अंडी उत्पादन नागपूर जिल्ह्याचे आहे. 

हैदराबादवरून 55 लाख अंडी येतात. तर, कर्नाटक, तमिळनाडूमधून 15 लाख अंडी येतात. याप्रमाणे बहुतांश गरज भागत असली, तरी काही प्रमाणात तुटवडा भासतो, असेही सांगण्यात आले. दर वर्षी थंडीच्या दिवसात दर वधारत 100 नगांसाठी 500 रुपयांपर्यंत ते पोहोचतात. या वेळी खरेदीदारांकडून उठाव नसल्याने दर 460 व त्यापेक्षाही खाली आले आहेत. 100 अंड्यांचा उत्पादन खर्च 430 रुपये आहे. दरातील घसरणीने उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील शक्‍य होत नसल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले. त्यातच पोल्ट्री खाद्याच्या दरातील तेजीचाही उत्पन्नावर परिणाम झाला आहे. 
 

उत्पादक खर्चाची भरपाई नाही 
सोयाबीन ढेप 38 हजार रुपये टन असून, त्यावर 5 टक्‍के जीएसटी आकारली जाते. मका 20 रुपये किलो, ब्रोकन राइस 188 रुपये किलो, सूर्यफुल ढेप 25 रुपये किलो, तांदूळ कोंडा 16 रुपये किलो आणि वाहतूक खर्च अशा प्रकारे पोल्ट्रीखाद्य महागले आहे. त्यातच अंडी दरात झालेली घसरण पाहता उत्पादकता खर्चाचीदेखील भरपाई होत नाही. 
-रवींद्र मेटकर, पोल्ट्री व्यावसायिक 
 

आवक वाढल्याने दर घटले 
दक्षिणेत अय्यपा उत्सवात त्या भागातील बहुतांश व्यक्‍तींना उपवास राहतो. परिणामी त्या भागात उत्पादित अंड्यांची मागणी घटल्याने ती अंडीदेखील मुंबईच्या बाजारात पोहोचली. त्याचाही दरावर परिणाम झाला. मकरसंक्रांतीला हा उपवास संपतो. त्यामुळे आता परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा आहे. पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणींबाबत लवकरच सरकारमधील मंत्र्यांशी संवाद साधण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरिता नियोजन केले जात आहे. शासकीय गोदामात असलेले धान्य मिळावे, अशी मागणी आहे. त्यामुळे बाजारातील खाद्याचे दर नियंत्रणात येतील. 
-श्‍याम भगत, संचालक, नॅशनल एग्ज कॉर्डिनेशन कमिटी 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com