आनंदवार्ता... खाऊ गल्ली'साठी प्रतीक्षा संपुष्टात 

news about khau galli in nagpur city
news about khau galli in nagpur city

नागपूर : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली "खाऊ गल्ली' सुरू करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी नव्या वर्षाचा मुहूर्त निश्‍चित केला. महापौर संदीप जोशी यांनी खाऊ गल्लीतील पार्किंगमधील तुटलेल्या फ्लोरिंगच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निविदा काढून सात दिवसांत काम करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. आयब्लॉक दुरुस्तीसाठी नगरसेवकांच्या निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये घेण्याचे ठरविण्यात आले. ही कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे नव्या वर्षात खाद्यप्रेमींना खाऊ गल्लीत विविध खाद्यपदार्थांची मेजवानी मिळणार आहे. 

शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधीसागर तलावाच्या एका काठावरील खाऊ गल्लीची महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी क्रीडा सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षला साबळे, नगरसेवक विजय चुटेले, धंतोली झोन सहायक आयुक्त किरण बगडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, माजी नगरसेवक मनोज साबळे उपस्थित होते. मनपाने नागपूरकर खाद्यप्रेमींसाठी सुंदर स्थळ बनविले. मात्र, त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तेथे असामाजिक तत्त्वांचा वावर वाढल्याचे नागरिकांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी "ब्रेकफास्ट विथ मेयर' या कार्यक्रमात खाऊ गल्ली सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी शनिवारी दौरा केला. 

परिसरातील दैनंदिन साफसफाईची जबाबदारी प्रभागाचे आरोग्य अधिकारी गायधने यांच्याकडे सोपविण्यात आली. महापौर संदीप जोशी यांच्या निर्देशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी सहायक आयुक्त किरण बागडे आणि उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांच्यावर निश्‍चित करण्यात आली. या कार्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौरांनी दिला. दिलेल्या निर्देशानुसार काम झाले अथवा नाही याबाबत आढावा घेण्यासाठी 20 डिसेंबर रोजी पुन्हा खाऊ गल्लीचा निरीक्षण दौरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


पुन्हा चकाकणार गांधीसागर 

खाऊ गल्ली परिसरात रोषणाई करण्यात आली होती. मात्र, हा प्रकल्प रखडल्याने काही काळानंतर पथदिवे बंद झाले. आता महापौरांनी परिसरातील सर्व पथदिवे तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिल्याने गांधीसागर पुन्हा एकदा चकाकणार आहे. खाऊ गल्ली पार्किंगस्थळी ठळक अक्षरात फलक लावणे, नागरिकांसाठी वॉटर एटीएम सुरू करणे, तलावाच्या रेलिंगला लागून असलेली झुडपे, गवत काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

80 लाखांचा खर्च 

खाऊ गल्लीसाठी 32 डोम उभे करण्यात आले आहे. या डोमला संत्र्यांचा रंग देण्यात आला. विविध खाद्यपदार्थांची मेजवानी खाद्यप्रेमींना मिळणार होती. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांनी या खाऊ गल्लीसाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. या खाऊ गल्लीवर 80 लाखांचा खर्च करण्यात आला. मात्र, येथे स्टॉल कुणाला द्यावे, कुणाला नाही? या वादात गेल्या तीन वर्षांपासून खाऊ गल्ली रखडली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com