पासवर्ड हॅक करून गंडविणाऱ्या नायजेरियनला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

नागपूर : देशातील अनेक कंपन्यांचे ई-मेल पासवर्ड हॅक करून लाखोंनी गंडविणाऱ्या एका नायजेरियन आरोपीला नागपूर पोलिसांनी मुंबईतून अटक केली. जेम्स ऊर्फ टोनी, ऊर्फ बाबा ज्यू गुडमॅन (वय 34) असे अटक आरोपीचे नाव आहे.

नागपूर : देशातील अनेक कंपन्यांचे ई-मेल पासवर्ड हॅक करून लाखोंनी गंडविणाऱ्या एका नायजेरियन आरोपीला नागपूर पोलिसांनी मुंबईतून अटक केली. जेम्स ऊर्फ टोनी, ऊर्फ बाबा ज्यू गुडमॅन (वय 34) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जेम्स गुडमॅन हा मूळचा नायजेरियातील बिरागी स्ट्रीट हटमेट, लागोस येथील आहे. तो टूरिस्ट व्हिजावर भारतात आला असून उच्चशिक्षित आहे. त्याने आतापर्यंत देशातील अनेक कंपन्यांचे वेबसाईट हॅक करून लाखोंनी चुना लावल्याचा आरोप जेम्सवर आहे. जेम्सने नागपूरचे व्यापारी संजय निचत (वय 51, रा. वासुदेवनगर, हिंगणा) यांच्या कंपनीची वेबसाईट हॅक करून कंपनीच्या नावावर स्वतः कमाई करीत होता. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संजय यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासात पोलिसांनी मुंबईतील नालासोपारा येथे छापा घालून जेम्सला अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये अनेक संशयास्पद कागदपत्रे आढळून आली आहेत. त्याने देशातील अनेक कंपन्यांच्या वेबसाईट हॅक करून पैसे स्वतःच्या बॅंकेत वळते केल्याचे आढळून आले. त्याला उद्या सोमवारी न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रीय महिलेची मदत
जेम्स याने महाराष्ट्रीय महिला जेबा इमरान खान हिला आपल्या कटात सामील करून घेतले. कमिशन बेसिसवर तिचे एसीबीआयच्या गोरेगाव ब्रॅंचमधील खाते वापरण्याची परवानगी घेतली. या खात्यात ग्राहकांना गंडा घातलेली रक्‍कम येत होती. जेम्सने अनेक कंपन्यांचे पेमेंट मोड बदलवून जेबा खानच्या खात्यात पैसे वळते होईल, अशी व्यवस्था केली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nigerian arrested for hacking password