
भंडारा : भंडारा जिल्ह्यासह शहरातही पूर आल्याने जनजीवन विस्कळित झाले. अनेक धरणांचे पाणी सोडल्यामुळे वैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले होते. शहरातील छत्रपती शाहूनगर, नागपूर नाका परिसरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे येथील १५ पूरपीडित कुटुंबांचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, सुहास गजभिये व मौदी येथील बांते यांच्यासह काही स्थानिक युवकांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून मदतकार्य सुरू केले. त्यामुळे नागपूर नाका परिसरातील नऊ कुटुंबांसह अडकलेल्या मायलेकांना बाहेर काढता आले. ऐनवेळी खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नामुळे बोटीची व्यवस्था झाल्याने सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलविता आले.
भंडारा जिल्ह्यात २७ व २८ ऑगस्टला अतिवृष्टी झाली. शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे रात्री गाढ झोपेत असलेल्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. शनिवारी दिवसभर पाण्याची पातळी वाढत होती. अशावेळी नागपूर नाका परिसरात अडकलेल्या नऊ कुटुंबातील ६० ते ६५ लोकांनी जीव मुठीत घेऊन रात्र काढली. यात वृद्ध मंडळी व लहान मुलांचा समावेश होता.
घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे, जीवनावश्यक साहित्य पुराच्या पाण्यामुळे ओलेचिंब झाले. सतत वाढत असलेले पुराचे पाणी पहिल्या माळ्याच्या स्लॅबपर्यंत पोहोचले. घरांमध्ये अडकलेले जीवाच्या आकांताने आरडाओरड करीत होते. शेजारी राहणारे पाण्यामुळे मदत करू शकत नव्हते.
रविवारी खासदार सुनील मेंढे यांच्या मदतीने मिळालेल्या बोटीतून धाडशी युवकांनी एक-एक करीत दिवसभरात नऊ कुटुंबातील ६० ते ६५ लोकांना बाहेर काढले. यातील सिल्ली येथील सुहास गजभिये, विवेक गजभिये, विकास वाहाने, अश्विन वाहाने, रायल वैद्य, मौदी येथील बांते व स्थानिक नागरिकांनी पूरपीडितांची मदत केली.
नागपूर नाका परिसरातील चिंचखेडे कुटुंबातील मायलेकांसाठी हा पूर जीवघेणा ठरला. घरात पुराचे पाणी शिरले, तेव्हा म्हातारी आई व मुलगा दोघेच होते. घरातील पाण्याची पातळी वाढली. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. तेव्हा त्यांनी दारे खिडक्या बंद करून स्वतःला आतमध्ये कोंडून घेतले. आईला सज्जावर बसवून मुलगा पंख्याला लटकून राहिला. आवाज देण्यासाठी तोंड उघडले तरी, तोंडात पाणी जाण्याची भीती होती. या परिस्थितीत त्यांनी रात्र काढली. जीव वाचवण्यासाठी अनेकांशी फोनवरून संपर्क साधला. परंतु, कोणीही मदतीसाठी आले नाही. शेवटी ३० ऑगस्टला खासदार मेंढे यांच्या प्रयत्नाने मदतीसाठी दोन बोटी देण्यात आल्या.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता बहिणीकडे आलेला सिल्ली येथील सुहास गजभिये व मौदी येथील बांते व स्थानिक नागरिकांनी आपला जीव धोक्यात टाकून पाण्यात बोट घातली. त्यावेळी घराच्या सज्जावर बेशुद्ध अवस्थेतील म्हातारी आई व पंख्याला लटकून असलेला मुलगा दिसला. मदतीसाठी आलेल्या युवकांनी व्हेंटिलेटरची खिडकी तोडून दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. ही बोट तेव्हा आली नसती तर, दोन्ही मायलेकांना घरातच जलसमाधी मिळाली असती. मात्र स्थानिक तरुणांचे धाडस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे मायलेकांचा जीव वाचला.
संपादन ः राजेंद्र मारोटकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.