नितीन गडकरींच्या ड्रिम प्रोजेक्‍टला का लागला ब्रेक?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

नागभीड हे रेल्वेचे जंक्‍शन ठिकाण आहे. येथून नागभीड-नागपूर रेल्वे चालते. जवळपास 116 किलोमीटर असलेला हा रेल्वेमार्ग नॅरोगेज आहे. त्यामुळे या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासूनची आहे. नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी कित्येकदा केंद्र, राज्यशासनाशी पाठपुरावा करण्यात आला. त्याची दखल घेत मागीलवर्षी नागभीड-नागपूर नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला.

चंद्रपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागभीड-नागपूर रेल्वे ब्रॉडगेज हा ड्रिम प्रोजेक्‍ट आहे. नागभीड-नागपूर नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. ब्रॉडगेजसाठी 922 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. डिसेंबर महिन्यापासून ब्रॉडगेजचे काम सुरू होणार असल्याचे सांगून नोव्हेंबर महिन्यात नागभीड-नागपूर ही रेल्वेसेवाच बंद करण्यात आली. मात्र, नागभीड-नागपूर ब्रॉडगेजसाठी एक रुपयाचीही तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे हा महत्त्वांकाक्षी प्रकल्प रेंगाळण्याची  शक्यता आहे.

जिल्ह्यातील नागभीड हे रेल्वेचे जंक्‍शन ठिकाण आहे. येथून नागभीड-नागपूर रेल्वे चालते. जवळपास 116 किलोमीटर असलेला हा रेल्वेमार्ग नॅरोगेज आहे. त्यामुळे या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासूनची आहे. नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी कित्येकदा केंद्र, राज्यशासनाशी पाठपुरावा करण्यात आला. त्याची दखल घेत मागीलवर्षी नागभीड-नागपूर नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. यासाठी 922 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली.

- भंडारा-पवनी मार्गावर भीषण अपघात, कंटेनर-टेम्पोच्या धडकेत दोन ठार
 

अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद नाही
यातील पन्नास टक्के वाटा राज्यशासनाचा राहणार आहे. गेल्यावर्षी एक डिसेंबरपासून ब्रॉडगेजचे काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे 22 नोव्हेंबर 2019 रोजी नागभीड-नागपूर ही रेल्वेसेवा बंद करण्यात आली. मोठा गाजावाजा करून रेल्वेला बिदाई देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात एक डिसेंबरपासून कामच सुरू झाले नाही. नुकताच रेल्वे प्रकल्पासाठी 2020-2011 च्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींची माहिती देणारे पिंक बुक रेल्वे बोर्डाने प्रकाशित केले. मात्र, त्यात नागभीड-नागपूर ब्रॉडगेज प्रकल्पासाठी निधीची तरतूदच करण्यात आली नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रिम समजल्या जाणारा हा प्रकल्प रेंगाळण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

- होम ट्यूशन घेणाऱ्या महिलेच्या डोक्‍यावर होता कर्जाचा डोंगर, मग निवडला हा पर्याय...

अलीकडेच नागपुरात बर्डी ते हिंगाणा मेट्रोचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात नागभीड-नागपूर मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो चालवू, असे सांगितले होते. मात्र, दुसरीकडे रेल्वे बोर्डाने प्रकाशित केलेल्या पिंक बुकात नागभीड-नागपूर ब्रॉडगेजसाठी निधीची तरतूद नाही. त्यामुळे या कामास विलंब लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

रेल्वे फाटक उखडले
नागभीड-नागपूर हा 116 किलोमीटरचा मार्ग आहे. या मार्गावर अनेक रेल्वेफाटके आहेत. एक डिसेंबरपासून काम सुरू होणार असल्याने या मार्गावरील सर्वच रेल्वे फाटके रेल्वेने काढून टाकली आहे. रेल्वे फाटक काढण्याची तत्परता दाखविणाऱ्या रेल्वे बोर्डाने ब्रॉडगेजसाठी निधी अडवून ठेवल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin gadkari dream project chandrapur