आनंदवार्ता : नागपूरकरांसाठी शैक्षणिक महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते थाटात उद्‌घाटन झाले.

नागपूर : शहरात नाटक, काव्य, संगीत व नृत्याचे सादरीकरण करणारे प्रतिभावंत आहेत. पण, त्यांना प्रोत्साहन देणारे नाहीत, अशा प्रतिभावंतांना व्यासपीठ मिळावे, कलागुणांचा विकास व्हावा यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा महोत्सव घेतला जात असताना आता शैक्षणिक महोत्सवसुद्धा घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते थाटात उद्‌घाटन झाले. या सोहळ्याला नितीन गडकरींची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, रामदास आंबटकर, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, महापौर संदीप जोशी, माजी महापौर नंदा जिचकार, गिरीश गांधी, संस्कार भारतीच्या कांचन गडकरी व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, उपस्थित होते. 

बहुप्रतीक्षित श्रीराम मंदीर प्रकरणाच्या उच्चस्तरीय समितीचे सदस्य असताना श्री श्री रविशंकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे गडकरींनी सांगितले. खासदार महोत्सवाची संकल्पना श्री श्री रविशंकर यांच्याच कार्यातून मिळाली असल्याचे सांगताना लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकसंस्कार या त्रिसूत्री धोरणाने स्थानिक कलाकारांचा विकास होईल असे उत्सव घेत असल्याचे गडकरी म्हणाले.

शहराचा भौतिक विकास पुरेसा नसून, अशाच कार्यक्रमातून नागरिक सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात प्रगल्भ होतील असे नितीन गडकरी म्हणाले. स्वप्न बघणे अन्‌ साकार करणे हाच नितीन गडकरी यांचा उत्तम गुण असल्याचे सांगत श्री श्री रविशंकर यांनी शहराच्या विकासाचे कौतुक केले. रोटी, कपडा, मकान मिळणे आवश्‍यक आहे. पण कला संस्कृतीच्या आधारे जगायचे कसे याचे शिक्षण लोकांना मिळाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष अनिल सोले यांनी केले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. 

रविशंकर भारताचे सांस्कृतिक दूत : गडकरी 
बर्लिन येथे झालेल्या कार्यक्रमात तेथे स्थानिक भारतीयांनी भव्य सादरीकरण केले. आज आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुमारे शंभराहून अधिक देशांमध्ये कार्य चालते. आध्यात्मिक, योगविज्ञान, आयुर्वेद आणि इतिहास संस्कृती रक्षणात श्री श्री रविशंकर यांचे जागतिक पातळीवर कार्य आहे. ही भारतीयांसाठी भाग्याची गोष्ट असून, रविशंकर भारताचे सांस्कृतिक दूत असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin gadkari, nagpur, educational program