तुमच्यापेक्षा माझे संशोधन भारी - नितीन गडकरी

Nitin-Gadkari
Nitin-Gadkari

नागपूर - संशोधन करणे विद्यापीठाचे प्रमुख काम आहे. काळानुरूप नवनवे संशोधन करावे एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून विद्यार्थ्यांची असते. मात्र, संशोधन सोडून राजकारणातच अधिक स्वारस्य असल्याचे सांगून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठाला चांगलेच फटकारले. तुमच्यापेक्षा माझे वैयक्तिक संशोधन अधिक दर्जेदार असल्याचा दावाही त्यांनी केला. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभाग व शिक्षण मंचच्या वतीने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कॅनडा येथील पर्यावरणतज्ज्ञ पाम कलसी उपस्थित होत्या. विद्यापीठाचे संशोधन आणि अंतर्गत राजकारणावर कायमच टीका करणाऱ्या गडकरींनी आज पुन्हा विद्यापीठाला झोडपून काढले. ते म्हणाले की, विद्यापीठापेक्षा माझी स्वत:ची प्रयोगशाळा मोठी आहे. विद्यापीठात अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत. पण, संशोधनात ते पिछाडीवर आहेत. आपल्या भवतालच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडविण्यावर संशोधन होणे आवश्‍यक आहे. यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही गडकरींनी केले. जगात ‘वेस्ट’ असे काहीच नाही. या ‘वेस्ट’मधूनच वेल्थ तयार होऊ शकते. 

सारेकाही शक्‍य आहे. केवळ विद्यापीठांनी नव्या संशोधनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शहराचे स्मार्ट परिवहन पर्यावरण रक्षणार्थ आवश्‍यक आहे. त्यासाठी सरकार कार्य करीत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. या वेळी शिक्षण मंचाच्या डॉ. कल्पना पांडे यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण आणि स्मार्ट सिटीचे नियोजन याची माहिती मिळावी, या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित केल्याचे सांगितले. मंचावर शिक्षण मंचचे डॉ. संजय दुधे, हिंदी विभागप्रमुख डॉ. प्रमोद शर्मा, डॉ. सतीश चाफले प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.

कुलगुरू, प्र-कुलगुरूंची अनुपस्थिती
चर्चासत्राच्या आयोजनात शिक्षण मंच ही भाजपशी संबंधित संघटना असल्याने केवळ भाजपच्या प्रचारार्थ हा कार्यक्रम होत असल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता. त्यासाठी आंदोलनही करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रम पत्रिकेत नाव असूनही या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. काणे, प्र-कुलगुरू डॉ. येवले अनुपस्थित असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com