महापालिकेतील अधिकारी "प्रेशर'मध्ये

राजेश प्रायकर
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

महापालिकेतील अधिकारी "प्रेशर'मध्ये
नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार, रक्तदाब नियंत्रणाच्या गोळ्या खिशात बाळगत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अतिरिक्त कार्यभार, नगरसेवकांचा संताप, कंत्राटदारांची देणी, विविध समिती सभापतींकडून कायम धारेवर धरले जात असल्याने अधिकाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

महापालिकेतील अधिकारी "प्रेशर'मध्ये
नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार, रक्तदाब नियंत्रणाच्या गोळ्या खिशात बाळगत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अतिरिक्त कार्यभार, नगरसेवकांचा संताप, कंत्राटदारांची देणी, विविध समिती सभापतींकडून कायम धारेवर धरले जात असल्याने अधिकाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती संकटात असून, प्रभागातील विकासकामेही ठप्प आहेत. विविधकामांच्या फाईल्स तयार झाल्या, मात्र निधीअभावी अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेवक अधिकाऱ्यांकडे तगादा लावत आहे. काही नगरसेवक अधिकाऱ्यांवर ओरडतात. मात्र, आयुक्तांनीच विकासकामांच्या निधीत कपात केल्याने अधिकाऱ्यांचीही नगरसेवकांना उत्तर देताना कोंडी होत आहे. याशिवाय मनुष्यबळाचा अभाव असल्याने एका अधिकाऱ्याकडे अनेक प्रभार सोपविले आहेत.
महापालिकेत मुख्य अभियंत्याचे पद रिक्त आहेत. कार्यकारी अभियंत्याकडेच अतिरिक्त कार्यभार दिला आहे. काही वर्षांत महत्त्वाचे विभाग सांभाळणारे अधिकारी निवृत्त झाले आहेत. त्यांचा कार्यभार इतर अधिकाऱ्यांना दिला. स्वतःची कामे करीत अतिरिक्त प्रभाराचीही कामे करावी लागत आहेत. कंत्राटदारांची दोनशे कोटींची देयके थकीत आहेत. झालेल्या कामांची बिले काढण्यासाठी कंत्राटदार अधिकाऱ्यांकडे तगादा लावत आहे. परंतु, तिजोरीत पैसा नसल्याने बिले काढण्यास अधिकारी असमर्थ आहे. कंत्राटदारांचा संतापही अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचीही स्थिती अशीच असून विविध विभागप्रमुख, अभियंते, अधिकाऱ्यांच्या खिशात सॉर्बिट्रेट, रक्तदाबासंबंधी विविध गोळ्या दिसून येत आहे.
पदाधिकाऱ्यांचाही जाच
दहा विशेष समित्यांच्या बैठकी, पदाधिकाऱ्यांकडून वेळीअवेळी बोलावणे आल्यानंतर त्यांच्याकडे ये-जा करणे, आयुक्तांची बैठक यातच अधिकाऱ्यांचा बराच वेळ निघून जात असल्याने त्यांच्या कामाचे नियोजनही फसत आहे. आयुक्तांच्या सक्तीमुळे अधिकाऱ्यांना उशिरा रात्रीपर्यंत कामे करावी लागत आहे. यातून अनेक अधिकाऱ्यांचा रक्तदाब वाढला आहे.
सॉर्बिट्रेट ही गोळी छातीत दुखणे, अचानक खूप घाम येणे अशी हृदयविकाराच्या झटक्‍याची लक्षणे दिसून आल्यानंतर घेतली जाते. अनेकदा मधुमेहाच्या रुग्णांना हृदयविकाराच्या धक्‍क्‍याची शक्‍यता असते. त्यावेळी ही गोळी घेतल्यास तज्ज्ञाकडे जाण्याएवढा कालावधी रुग्णाला मिळतो.
- डॉ. शरद धुर्वे,
मेडिसिन विभाग.

Web Title: NMC personnel work in pressure