पाण्यावरील विशेष सभेला अधिकाऱ्यांची दांडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पाण्यावरील विशेष सभेला अधिकाऱ्यांची दांडी
नागपूर : उन्हाळ्यापूर्वीच शहरावर जलसंकट असून उपाययोजनांबाबत माहिती घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेला अधिकाऱ्यांनीच दांडी मारली. आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह जलप्रदाय विभागातील अधिकारीही अनुपस्थित असल्याने सत्ताधारी व विरोधकांनीही नाराजी व्यक्त करीत सभा स्थगित करण्याची सूचना महापौरांकडे केली. महापौरांनी अखेर विशेष सभा स्थगित केल्याची घोषणा केली.

शहरावरील पाणीटंचाईवरून महापौरांनी 3 नोव्हेंबरला विशेष सभेची घोषणा केली होती. मात्र, दिवाळीमुळे ही सभा रद्द करण्यात आली. विशेष सभा रद्द केल्याने विरोधी तसेच सत्ताधारी नगरसेवकांनीही तीव्र संताप व्यक्त केला. अखेर आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याबाबतही प्रशासनाने सुरुवातीला केवळ दोन तासांच्या विशेष सभेची नोटीस काढली होती. यावरूनही प्रशासनाबाबत तीव्र चीड निर्माण झाली होती. अखेर विशेष सभेच्या पूर्वसंध्येला काल, विशेष सभेनंतर होऊ घातलेली सर्वसाधारण सभा रद्द करून वेळ वाढविला. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी पाण्यासंदर्भातील प्रश्‍नांवर प्रशासनाला घेरण्याची व्यूहरचना केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी नगरसेवकांचा अपेक्षाभंग केला. पालिकेच्या सभेची नोटीस काही दिवसांपूर्वी निघाल्यानंतरही आज अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे पडसाद सभागृहात उमटले. नगरसेविका आभा पांडे यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, जलप्रदायचे अधिकारी अनुपस्थित असल्याने सभेचे काहीच औचित्य नसल्याचे सांगितले. जेव्हा अधिकारी येतील, तेव्हाच सभा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी पाण्यासारख्या गंभीर चर्चेदरम्यानही अधिकारी अनुपस्थित असल्याने नाराजी व्यक्त केली. आयुक्तांच्या अनुपस्थितीत सभा घ्यावी की नाही, याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सत्तापक्ष पाणीप्रश्‍नावर गंभीर असल्याचे स्पष्ट केले. आयुक्तांना खासगी कामामुळे तर अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांना नगर विकास विभागाच्या बैठकीसाठी अचानक मुंबईला जावे लागले. त्यामुळे सभा स्थगित करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी महापौरांना केली.
7 डिसेंबरची सभा वादळी
महापौर नंदा जिचकार यांनी 7 डिसेंबरला पाण्यावर विशेष सभा घेण्याची घोषणा केली. तत्पूर्वी सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी पाण्यावर प्रशासन गंभीर नसल्याचे सत्तापक्षाचे मत असल्याचे सांगितले. त्यामुळे 7 डिसेंबरला होऊ घातलेल्या सभेत सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही प्रशासनावर तुटून पडणार आहे. त्यामुळे ही सभा वादळी ठरण्याचे संकेत आहे.

Web Title: NMC sabha news