भंडारा रुग्णालय आग प्रकरण : आऊट बॉर्न युनिटबद्दल समोर आली धक्कादायक माहिती

केवल जीवनतारे
Sunday, 10 January 2021

भंडारा येथील घटनेनंतर काही रुग्णांच्या नातेवाइकांशी संवाद साधल्यानंतर मात्र येथील अनेक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नागपुरातून अपडाऊन करत असल्याची जोरदार चर्चा येथे रंगली होती.

भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या आगीत होरपळून दहा नवजात शिशू दगावले. अशीच घटना ३१ ऑगस्ट २०१९ मध्ये मेयोतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात घडली होती. त्यावेळी मात्र परिचारिका अतिदक्षता विभागात तैनात होती. 

अतिदक्षता विभागात २४ तास डॉक्टर, परिचारिका कर्तव्यावर असतात. मात्र, भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या आगीच्या घटनेकडे बघताना अतिदक्षता विभागात (आउट बॉर्न युनिट) एकही वैद्यकीय अधिकारी, परिचारिका किंवा पॅरामेडिकलचा कर्मचारी तैनात असू नये हेच या घटनेतील दुर्दैव. ही घटना घडत असताना वैद्यकीय अधिकारी, परिचारिका या आउट बॉर्न युनिटमध्ये यावेळी कर्तव्यावर असते, तर ही हानी टाळता आली असती

हेही वाचा -. एकाचवेळी दहा गावांमध्ये दुःखाचा महापूर, बाळाला दूध पाजून येताच क्षणार्धातच कळली मृत्यूची बातमी

मेयोत वर्षभरापूर्वी घडलेल्या अशाच घटनेत अतिदक्षता वॉर्डात तैनात असलेल्या सविता इखार या परिचारिकेने दोन्ही हातात पाच मुलांना घेऊन ती बाहेर आली होती. त्यावेळी मोठी हानी टाळण्यासाठी त्या परिचारिकेने आग लागल्यानंतर प्रथम ऑक्सिजनचे जंबो सिलेंडर बंद केले होते. शिवाय लहान बाळांना बाहेर काढत असताना त्यांनी बाळाचे ओळख पटणारे बॅचदेखील सुरक्षितपणे ठेवले होते. मात्र, भंडाऱ्यातील शनिवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आउट बॉर्न युनिटमधून धूर निघत असताना ड्यूटीवर असलेल्या नर्सने दार उघडले, हे येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आउट बॉर्न युनिटचे दार बंद होते, हीच चर्चा रुग्णालयात होती, या आउट बॉर्न युनिटमध्ये असलेल्या टेबलखुर्चीत ना अधिकारी होते, ना परिचारिका. हेच यावरून स्पष्ट होते. घटना घडून गेल्यानंतर सारे पोहोचले. त्याच खोलीच्या दुसऱ्या बाजूला इन बॉर्न युनिट आहे. ही मुले याच रुग्णालयात जन्माला आली. यामुळे ती सुरक्षित राहिली. त्यांच्यासाठीही इन बॉर्न (अतिदक्षता) युनिट आहे. त्यांना बाहेर काढत सुरक्षित वॉर्डात हलविण्यात आले. 

हेही वाचा -. एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

काही डॉक्टर नागपुरात -
भंडारा येथील घटनेनंतर काही रुग्णांच्या नातेवाइकांशी संवाद साधल्यानंतर मात्र येथील अनेक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नागपुरातून अपडाऊन करत असल्याची जोरदार चर्चा येथे रंगली होती. यावरून काही नातेवाइकांनी संतापही व्यक्त केला होता. नागपूरच्या अधिकाऱ्यांकडूनही जिल्हा रुग्णालयात वारंवार भेट द्यावी, असा नियम सांगतो. परंतु, या नियमांना आरोग्य विभागाकडून हरताळ फासण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री, आयुक्त किंवा संचालक आल्यानंतरच आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांची पावले जिल्हा रुग्णालयाच्या भेटीसाठी वळत असतात, असाही सूर रुग्णालयातील चर्चेतून पुढे आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no nurse present in out born unit at the time of bhandara fire incident