आरोग्य विभागाचा डोलारा प्रभारीवरच; नियमित डीएचओंची प्रतीक्षा, कोविडच्या काळात खेळखंडोबा

सूरज पाटील
Thursday, 29 October 2020

गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण आरोग्ययंत्रणा कोविड युद्घात लढत आहे. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, आरोग्याचे कारण देत कोविड संक्रमणाच्या काळात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण दीर्घ रजेवर गेले होते.

यवतमाळ  :  ग्रामीण भागाशी नाळ जुळलेल्या आरोग्य विभागाचे नियमित जिल्हा आरोग्य अधिकारी हे रजेवर गेल्याने या विभागाचा डोलारा प्रभारावरच उभा आहे. कोविड काळात सुरू असलेल्या संगीत खुर्चीमुळे आरोग्याचा खेळखंडोबा झाला आहे. 

गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण आरोग्ययंत्रणा कोविड युद्घात लढत आहे. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, आरोग्याचे कारण देत कोविड संक्रमणाच्या काळात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण दीर्घ रजेवर गेले होते. वैद्यकीय संघटनेचे नाराजीनाट्य सुरू होण्यापूर्वी ते रूजू झाले. जिल्हाधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. आता काम करायचे नाही, अशी गर्जना करीत पदाचा राजीनामा दिला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून तोडगा काढण्यात आला. हा तणाव निवळत असताना कोरानाची अतिरिक्त जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्याकलयाकडे आली. पुन्हा डॉ. चव्हाण रजेवर निघून गेले. डॉ. पी. बी. चव्हाण यांच्यानंतर डॉ. हरी पवार यांच्याकडे डीएचओची जबाबदारी देण्यात आली.

हेही वाचा - प्रेमाचं अनोखं उदाहरण! शेतकऱ्याने पार पाडले मृत बैलाचे दशक्रिया विधी; लोकांना दिले...

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राची संख्या, ग्रामीण जनतेसाठी कोरोना काळात उपचारासाठी शासकीय आरोग्ययंत्रणेचा एकमेव आधार आहे. अशा वेळी नियमित कॅप्टन नसेल तर टीम वर्कची अपेक्षा करता येत नाही. सर्व कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याची ओरड केली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण हे यवतमाळ येथे राहण्याच्या मानसिकतेत नाही. त्यांना साइड ब्रॅंचला काम करायचे आहे, असे बोलले जात आहे. आरोग्य विभागातील संगीत खुर्चीचा खेळ संपून नियमित अधिकाऱ्याकडे जबाबदारी यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकारी रजेवर असले तरी त्याचा कोणताही परिणाम आरोग्य विभागाच्या कामकाजावर झालेला नाही. प्रभारी डीएचओ पूर्ण वेळ कार्यालयात उपस्थित राहून कामकाज सांभाळत आहेत. कोरोनाबाबत आमच्याकडूनही नियमित आढावा घेतला जात आहे. 
- श्रीधर मोहोड, आरोग्य सभापती, जिल्हा परिषद, यवतमाळ.

हेही वाचा - शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हद्दपार करा; महापौर चेतन गावंडे यांचे आढावा बैठकीत निर्देश

धोका टळलेला नाही -
कोरानाचा संसर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाला होता. मागील काही दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट झाली आहे. हा एकप्रकारे दिलासादायक असला तरी धोका अजूनही टळलेला नाही. आता हिवाळ्याला सुरुवात होत आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा आकडा फुगण्याची भीती व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no permanent dho in yavatmal health center