शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हद्दपार करा; महापौर चेतन गावंडे यांचे आढावा बैठकीत निर्देश

कृष्णा लोखंडे 
Thursday, 29 October 2020

अग्निशमन विभागाकरिता यंत्रसामग्री खरेदी करण्याचे नियोजन करून ते सादर करण्याचे निर्देश महापौर चेतन गावंडे यांनी प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांना दिले.

अमरावती ः हॉकर्स झोन तयार करून अनधिकृत फेरीवाल्यांना हद्दपार करा, डेंगी साथरोगाच्या निर्मूलनासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना राबवाव्या, मालमत्ता कर वसुलीसाठी गेट वे प्रणाली अमलात आणावी, जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल, असे नियोजन करावे, अग्निशमन विभागाकरिता यंत्रसामग्री खरेदी करण्याचे नियोजन करून ते सादर करण्याचे निर्देश महापौर चेतन गावंडे यांनी प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांना दिले.

क्लिक करा - संगीत कलाकार दारोदार भटकत विकतोय प्लास्टिकच्या वस्तू, पण त्यातूनही भागत नाही पोटाची भूख

स्थायी समितीच्या स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात महापौरांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेत आढावा घेतला. या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन, फिशरी हब, छत्रीतलाव विकास, राजापेठ उड्डाणपूल, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, साथरोग, बाजार व परवाना विभागाकडून उत्पन्न, अग्निशमन दलास जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीचा उपयोग, समाज विकास विभागातील दिव्यांग योजना व अनुदान, सर्व विभागांचे संगणकीकरण, मोकाट पशू, फिशरी हब, शिवटेकडी विकास, शहरातील उद्यानांची स्थिती, फेरीवाल्याचे वाढते अतिक्रमण, मालमत्ता कर उत्पन्न अशा विविध विषयांचा त्यांनी आढावा घेतला.

यासोबतच त्यांनी उत्पन्नवाढीसाठी बाजार व परवाना विभागाकडून जाहिरातींच्या माध्यमातून कशाप्रकारे उत्पन्न मिळू शकते याचे नियोजन करणे, मालमत्ता कर विभागाकडून गेट वे प्रणालीची अमलबजावणी, शैक्षणिक दर्जा वाढविणे, विकास शुल्कात वाढ करणे, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रकरणे मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा केली. अमृत योजनेतील कामे व दलित वस्ती योजनेतील कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत.

हेही वाचा - प्रेमाचं अनोखं उदाहरण! शेतकऱ्याने पार पाडले मृत बैलाचे दशक्रिया विधी; लोकांना दिले तेराव्याचे जेवण

बैठकीला उपमहापौर कुसुम साहू, सभागृह नेता सुनील काळे, नगरसेवक मिलिंद चिमोटे, प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, उपआयुक्‍त सुरेश पाटील, पर्यावरण संवर्धन अधिकारी तथा कर मूल्यनिर्धारण अधिकारी महेश देशमुख, सहायक संचालक नगररचना आशीष उईके यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह सर्व विभागप्रमुख हजर होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remove illegal the hawkers from city said mayor of Amravati