अभिनंदनीय! या गावानेच घेतला तंबाखूमुक्तीचा वसा! 90 टक्‍के शहर तंबाखूमुक्त

मिलिंद उमरे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

थुंकीतून कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे तंबाखू, खर्रा, नस, गुडाखू, सिगारेट, बिडी यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. ही बंदी यशस्वी करण्यासाठी देसाईगंज किराणा व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद केली.

देसाईगंज (जि. गडचिरोली) : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढता धोका व प्रशासनाचे निर्देश लक्षात घेत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पूर्णत: बंद करण्यासाठी मुक्तिपथ अभियान व देसाईगंज किराणा व्यापारी असोसिएशनची बैठक नुकतीच पार पडली होती.

बैठकीत शहर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला होता. त्या अनुषंगाने वाटचाल सुरू असून आतापर्यंत 90 टक्‍के शहर तंबाखूमुक्त झाले असल्याचा दावा किराणा व्यापारी असोसिएशनने केला आहे. तसेच उर्वरित मुजोर तंबाखू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन असोसिएशनतर्फे पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी रूपाली बावनकर यांना सादर केले. यावेळी तंबाखू विक्रेत्यांवर पोलिस प्रशासन कारवाई करणार असल्याची ग्वाही बावणकर यांनी दिली.

थुंकीतून कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे तंबाखू, खर्रा, नस, गुडाखू, सिगारेट, बिडी यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. ही बंदी यशस्वी करण्यासाठी देसाईगंज किराणा व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद केली. आतापर्यंत जवळपास 90 टक्‍के शहर तंबाखूमुक्त झाले असल्याचा दावादेखील असोसिएशनने केला आहे. मात्र, शहरातील काही मुजोर लोक आताही कायद्याचे उल्लंघन करीत तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री करीत आहेत. त्या विक्रेत्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी देसाईगंज किराणा व्यापारी असोसिएशनचे जेसा मोटवानी, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांनी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी रूपाली बावनकर यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच अवैध तंबाखू विक्रेत्यावर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन सादर केले. यावेळी तंबाखूविक्रीवर अंकुश लावण्यासाठी पुढाकार घेत कारवाई करणार असल्याची माहिती बावणकर यांनी दिली. मुक्तिपथ अभियान, देसाईगंज किराणा व्यापारी असोसिएशन व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त पुढाकारातुन देसाईगंज शहर 100 टक्‍के तंबाखूमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

सविस्तर वाचा - स्तनपान आहे बाळाचा जीवनाधार

थुंकणाऱ्यांवर कारवाई....
आरमोरी येथील मुक्तिपथ तालुका कार्यालय, नगर परिषद, पोलिस प्रशासन यांनी सलग दोन दिवस शहरात गस्त घालून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 18 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण 1 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी विनामास्क फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. थुंकीच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होतो. यावर उपाययोजना करण्यासाठी मुक्तीपथ अभियानाच्या पुढाकारातून स्थानिक प्रशासनाने शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एकूण 18 नागरिकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 1800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No tobacco in this village