जिल्हा परिषदेत टेबलधारींचे वर्चस्व.. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठिय्या; बदली प्रक्रीयेकडे लक्ष

सूरज पाटील 
Sunday, 2 August 2020

जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या येत्या दहा ऑगस्टपर्यंत समुपदेशनाने करावयाच्या आहेत. अध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांच्यासमक्ष बदलीपात्र कर्मचाऱ्यांना पदस्थापना देण्याची प्रक्रिया समुपदेशानाने करण्यात येणार आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषदेचे राजकारण ज्यांना कळले, त्यांचे चांगभलंच झालं आहे. कर्मचारी संघटनांचा आडोसा घेत कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. बदलीप्रक्रीयेतून नेहमीच दूर राहिलेल्या टेबलधारींचे वर्चस्व जिल्हा परिषदेत बघावयास मिळते. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठिय्या मांडून असल्याने त्यांची मनोपल्ली वाढली आहे. आता होऊ घातलेल्या बदलीप्रक्रीयेत टेबलधारी हटणार की, तेथेच कायम राहणार, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या येत्या दहा ऑगस्टपर्यंत समुपदेशनाने करावयाच्या आहेत. अध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांच्यासमक्ष बदलीपात्र कर्मचाऱ्यांना पदस्थापना देण्याची प्रक्रिया समुपदेशानाने करण्यात येणार आहे. प्रशासकीय, विनंती, आपसी बदली पात्र कर्मचाऱ्यांना आवश्‍यक त्या दस्तऐवजांसह उपस्थित राहावे लागणार आहे. मंगळवार चार ते शनिवार आठ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

तालुकास्तरावर करावयाच्या बदल्या गटविकास अधिकारी यांना नऊ व दहा ऑगस्टला करायच्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी हे आदेश काढले आहेत. जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण, सामान्य प्रशासन विभाग, सिंचन विभाग, कृषी विभाग, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, वित्त, पंचायत आदी प्रमुख विभाग आहेत. या विभागात काही कर्मचारी अनेक वर्षांपासून ठिय्या मांडून बसले आहे. आपले काहीच होणार नाही, हा तोरा या कर्मचाऱ्यांमध्ये बघावयास मिळतो. साहेबांशी असलेल्या सलगीमुळे दुखावलेले व काम न झालेले व्यक्ती त्यांच्या वाटेला जात नाही.

हेही वाचा - शादी डॉट कॉमवर दोघांचे प्रोफाईल मॅच झाले. मने जुळली, लग्नही झाले. मग उघड झाले हे सत्य...

कर्मचारी संघटनांकडून अशा कर्मचाऱ्यांची नेहमीच पाठराखण केली जाते. विभागप्रमुखानंतर संबंधित विभागात टेबलधारींचाच बोलबाला असल्याचे चित्र बघावयास मिळते. नव्याने रुजू झालेले सीईओ टेबलधारींचा पायंडा मोडीत काढतात की नाही, हे बघणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

'एचओडीं'च्या स्वागताला तेच पुढे

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत विभागप्रमुख बदलून येतात आणि जातात. मात्र, टेबलधारी वर्षानुवर्षे कायम असतात. नवीन एचओडी रुजू झाल्यास हेच टेबलधारी स्वागतासाठी पुढे-पुढे करून संधी साधून घेतात. एकदा साहेबांची मर्जी संपादित केली की, पुढील काही वर्षांसाठी हे कर्मचारी बिनधास्त राहतात. त्यामागे असलेले "गणित'ही लपून राहिले नाही.

असे आहे वेळापत्रक

महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन विभागांतील बदलीप्रक्रीया चार ऑगस्ट, साप्रवि, सिंचन, कृषी विभागात पाच ऑगस्ट, बांधकाम, वित्त, शिक्षण, सहा ऑगस्ट, पंचायत विभाग सात तर, आरोग्य विभागाची बदलीप्रक्रीया आठ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक सभागृहात पार पडणार आहे.

क्लिक करा -  पतीने स्वतःच्याच पत्नीला केली ही विचित्र मागणी...अखेर कंटाळलेल्या पत्नीची पोलिसात धाव.. वाचा काय आहे संपूर्ण प्रकार..

'कोविड' नियमांचे पालन

समुपदेशनाच्या वेळी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. केवळ बदलीपात्र कर्मचाऱ्यांनाच बोलाविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सामाजिक अंतर, मास्क बांधणे, थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक राहणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्यास कोरोना सदृश लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाला तातडीने कळविले जाणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no transfers of employees in yavatmal ZP