पावसाळा लागला तरी मिळाली नाहीत तेंदुपत्ता तोडाईची मजुरी, आदिवासी विवंचनेत!

tendupatta_
tendupatta_

भामरागड(जि. गडचिरोली) : आदकवासी बहुल भागात रोजगाराची साधने मर्यादित. शेती आणि वनांवर आधारित उपजीविका असलेल्या आदिवासींसाठी तेंदुपत्ता तोडाई हे उत्पन्नाचे बऱ्यापैकी साधन असते. मात्र यंदा अजूनही तेंदुपत्ता तोडाईची मजुरी मिळालेली नाही. हातावर पोट असलेल्या या मंडळींनी जगायचे तरी कसे आणि खायचे तरी काय? असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

तालुक्‍यातील मन्नेराजाराम, ईरकडुम्मे, पल्ली, येचली व मडवेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 28 गावांतील तेंदूपत्ता तोडाई व संकलनाची मजूरी पावसाळ्याला सुरुवात झाली तरी अद्याप मिळाली नाही. त्यामुळे तेंदूपत्ता तोडाईची व संकलनाची मजुरी द्या, असा आर्त टाहो आदीवासीबांधवांनी बुधवारी (ता. 15) पत्रकार परिषद घेऊन फोडला आहे.

बुधवारी (ता. 15) आदिवासी बांधवांनी या अन्यायाचा निषेध केला. आणि पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडताना सांगितले की, तेंदूपत्ता हंगाम मे 2020 मध्ये ग्रामसभेद्वारे ग्रामपंचायत मन्नेराजाराम, ईरकडुम्मे, पल्ली व मडवेली येथील ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या 28 गावांनी तेंदूपत्ता कंत्राटदार यांच्याशी 400 रुपये प्रतिशेकडा व रॉयल्टी 400 रुपये प्रतिशेकडा प्रमाणे दर ठरवून करारनामा केला. यावर्षी कोविड-19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र टाळेबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया पार पाडणे शक्‍य झाले नाही.

ग्रामसभांनी परस्पर स्वतः ठरवून कंत्राटदाराशी करारनामा करून घेतला. त्यानुसार पाच ग्रामपंचायतीअंतर्गत 28 गावांनी तेंदूपत्ता तोडाई करून संकलन केले. यामध्ये ग्रामपंचायत मन्नेराजाराम 12,32,000 पुडा, ग्रामपंचायत ईरकडुम्मे 18,57,840 पुडा, ग्रामपंचायत पल्ली 12,92,620पुडा, ग्रामपंचायत येचली 76000 पुडा व ग्रामपंचायत माडवेलीअंतर्गत 10, 83, 810 पुडा, असे एकूण 61 लाख 72 हजार 270 पुडा तेंदूपत्ता तोडाई व संकलन करण्यात आले. कंत्राटदार बोदभराई करून सर्वच तेंदूपत्ता घेऊन गेले. मात्र 28 गावांतील तेंदूपत्ता तोडाई करून संकलन करणाऱ्या नागरिकांना त्यांची रक्कम अजूनही मिळाली नाही. तसेच फडीमुन्शी, मदतनीस, बोदभराई, पाणी मारणे, पलटाई आदी कामांची मजुरीसुद्धा मिळाली नाही.

आता शेती कशी करायची याच विवंचनेत असतानाच कुटुंब चालविण्याची चिंताही त्यांना लागली आहे. कोरोना महामारीमुळे रोजगारही उपलब्ध नाही. त्यामुळे जीवन कसे जगावे, असा यक्षप्रश्‍न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. पत्रकारपरिषदेला शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त सीताराम मडावी, माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती इंदरशाह मडावी, मदन वेलादी, लक्ष्मण मडावी, बापू नागपूरकर, संजू येजुलवार व पाचही ग्रामपंचायतीअंतर्गत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

सविस्तर वाचा -  तीन मित्र मासेमारीसाठी गेले, दोघे नदीपात्रातून समोर निघून गेले तर तिसरा...

चिंता वाढली
तेंदूपत्ता हंगाम हा येथील बहुसंख्य आदिवासी व इतरही नागरिकांसाठी आर्थिक पर्वणीच असतो. संपूर्ण वर्षाचे आर्थिक बजेट तेंदूपत्ता हंगामावरच अवलंबून असते. येथील लोकांचे मुख्य उपजीविकेचे हे महत्त्वाचे साधन आहे. याच पैशांतून लोकांचे घर चालते. मुलांचे शिक्षण, औषधे, कपडे, शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, अवजारे व खत आदींसाठी याच पैशावर अवलंबून राहावे लागते. मात्र, यावर्षी पावसाळा सुरू झाला तरी तेंदूपत्ता तोडाई व संकलनाचे पैसे अजूनही मिळाले नसल्याने येथील आदिवासी चिंतित आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com