मुलगा घ्यायला आला तरी जाणार नाही..!

मुलगा घ्यायला आला तरी जाणार नाही..!

नागपूर - आई वेडी झाली, म्हणून पोटच्या मुलाने बेवारसपणे सोडून दिले. पोलिसांच्या मदतीने ती माता मनोरुग्णालयात पोहोचली. मनोरुग्णालयाने तिला नाव दिले सुनीता... तिने पन्नाशी पार केली. आजही ती आपल्या मुलाचीच आतुरतेने वाट पाहत आहे. आज ना उद्या तो येईल... त्याला डोळे भरून पाहीन... त्यानंतर तो लगेच सोबत घेऊन जाईल, या आशेवर ती जगत आहे. ती सध्या पूर्ण बरी झाली. मात्र आता तिने मुलाची वाट पाहणे सोडून दिले. मुलगा आला तरी मी जाणार नाही, मी येथेच या माझ्या मुलांची सेवा करीन, असे सांगत लहान वयातील मनोरुग्णांना सकाळी नाश्‍ता खाऊ खालण्यापासून तर जेवण देण्यात ती आपला वेळ घालवते. 

अशा एक नव्हे तर उपचारातून बऱ्या झालेल्या १४ लोकांनी येथे मनोरुग्णांच्या सेवेत आपले आयुष्य घालवण्याचा संकल्प त्यांनी केला. एक परिवार येथे तयार झाला असून कोणी भाऊ तर कोणी बहीण तर कोणी आई... या नात्यांची वीण मनोरुग्णांत तयार झाली आहे.  

एकदा मानसिक रुग्ण असल्याचा ठपका लागल्यानंतर कुटुंबातील लोक दूर जातात. बरे झाल्यानंतरही आपल्या परिवारातील व्यक्तीला नेत नाहीत. अशा १४ जणांना कुटुंबाने झिडकारले. यामुळे यांनी मनोरुग्णांशी नाते जोडून आपला सहाशे लोकांचा परिवार तयार केला आहे. हे सर्व जण मनोरुग्णांची आस्थेने चौकशी करतात. त्यांना खाऊपिऊ घालतात. त्यांची सेवा करताना दिसतात. 

सध्या मनोरुग्णालयात साडेपाचशेवर मनोरुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. त्यापैकी १२५ पेक्षा अधिक मनोरुग्ण बरे झाले आहेत. मात्र त्यांना काही प्रमाणात औषधौपचाराची गरज पडते. मात्र १४ जण शंभर टक्के बरे झाले आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र सुधारित वॉर्ड तयार करण्यात आला.  यांची मानसिक आरोग्यातून सुटका करून देण्यासाठी मनोविकार तज्ज्ञांसहित परिचारिका आणि सामाजिक कार्यकर्ते यांचेही मोलाचे योगदान असते. ८ पुरुष तर ६ महिलांना कुटुंबांनी नाकारल्याने मनोरुग्णालयातच आपले कुटुंब उभारले. चक्क मनोरुग्णांची सेवा करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले असल्याचे त्यांच्या सौजन्यपूर्ण वागणुकीतून दिसून येत असल्याचे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांनी सांगितले. 

हळूहळू मनोरुग्णांमध्ये सुधारणा होते. ती परत माणसात येतात. मात्र त्यांचं माणुसपण परिवारालाच मान्य नसते. आज मनोरुग्णालयात सव्वाशेवर मनोरुग्ण बरे झाले आहेत. त्यांना आपला परिवार हवा आहे. यातील १४ जण तर स्वतःची कामे स्वतः करतात. आणि इतर मनोरुग्णांना कपडे घालून देतात. सकाळी न्याहारीत मिळालेली अंडी काही मनोरुग्णांना खाता येत नाहीत, अशावेळी यातील काही जण ती मनोरुग्णांना भरवतात. एकप्रकारे एक परिवार येथे तयार झाला आहे. 
- डॉ. माधुरी थोरात, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com