esakal | गावात तब्बल ४ महिन्यांपासून पाणीपुरवठा नाही; तहानलेल्या नागरिकांचे होतात प्रचंड हाल  
sakal

बोलून बातमी शोधा

no water supply in this village from last 4 months

गडचिरोली ते चामोर्शी या महामार्गाचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे काम अतिशय कासवगतीने सुरू असून अनेकदा मार्गाच्या कामात मध्ये येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनही तुटतात

गावात तब्बल ४ महिन्यांपासून पाणीपुरवठा नाही; तहानलेल्या नागरिकांचे होतात प्रचंड हाल  

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : येथील गडचिरोली-चामोर्शी महामार्गाचे बांधकाम सुरू असून या बांधकामामुळे चामोर्शी तालुक्‍यातील नवेगाव रै. या गावाची पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना गावाजवळच्या वैनगंगा नदीवरून पाणी आणावे लागत आहे. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असूनही या गावाच्या समस्येची दखल अद्याप घेण्यात आली नाही.

गडचिरोली ते चामोर्शी या महामार्गाचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे काम अतिशय कासवगतीने सुरू असून अनेकदा मार्गाच्या कामात मध्ये येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनही तुटतात. काही ठिकाणी हा सिमेंट-कॉंक्रिटचा मार्ग बांधताना आधीचा रस्ता खोदल्यावर खड्ड्यात पाणी भरू नये म्हणूनही पाणीपुरवठा थांबविण्यात येतो. असाच काहीसा प्रकार या गावासंदर्भात घडला आहे. 

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

या गावात विहिरी असल्या तरी सर्वच विहिरींचे पाणी खारट आहे. हे खारे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. शिवाय गावात दोन हातपंप आहेत. पण, हे हातपंपसुद्धा खारेच पाणी देतात. गावापासून काही अंतरावर वैनगंगा नदी वाहत असली, तरी गावाच्या जमिनीखाली दगड असून त्यावरील पाणी खारे असल्याने गावात विहीर किंवा हातपंप खोदल्यास खारे पाणीच लागते. त्यामुळे पूर्वी गावातील नागरिक नदीचेच पाणी वापरायचे. काही वर्षांपूर्वी गावात पाणीपुरवठा योजना सुरू झाली होती. त्यामुळे या गावातील ही समस्या मार्गी लागली होती. मात्र, मागील चार महिन्यांपासून येथील पाणीपुरवठाच बंद आहे. 

गावातील पुरुष मंडळी सायकलला प्लास्टिकच्या डबक्‍या बांधून नदीघाटावर जातात. तेथे डबकीत पाणी भरून घरी आणतात. घरात पिण्याचे, अंघोळीचे व इतर वापराचे पाणी पुरवण्यासाठी त्यांना अनेक फेऱ्या माराव्या लागतात. येथील बहुतांश नागरिक शेतकरी आहेत. सध्या धानकापणीचे दिवस असताना शेताकडे लक्ष द्यावे की, पाणी भरावे, हा प्रश्‍न त्यांना भेडसावत आहेत. 

येथील नदीतून पाणी आणणाऱ्या ग्रामस्थांपैकी काहीजण घरी पाणी आणल्यावर ते नीट उकळून त्याचा पिण्यासाठी वापर करतात. पण, सारेच असे करतात असे नाही. त्यामुळे गावात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे. म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील पाणी समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे..

अधिक माहितीसाठी - साहेबऽऽ आता आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार; पिककर्जाची अत्यंत गरज

विश्‍वासच नाही

या गावातील समस्या समजून घेताना नदीवरून पाणी नेणाऱ्या नागरिकांशी चर्चा केली असता त्यांनी अद्याप संबंधित विभाग, महामार्ग बांधणारेकंत्राटदार किंवा अधिकाऱ्यांना साधे निवेदनही दिलेले नाही. मागील चार महिन्यांपासून ही समस्या ग्रामस्थ मुकाट्याने सहन करत आहेत. आम्ही गाऱ्हाणे मांडले, तरी आमची समस्या सुटेल, असा विश्‍वास नसल्याचे काही ग्रामस्थ म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

loading image
go to top