खवय्यांसाठी खूष खबर! आता मुंबईकरांना सुद्धा खाता येणार गोड्या पाण्यातील मासे 

fish hub
fish hub

अमरावती  : समुद्रातील खाऱ्या पाण्यातील माशांसोबतच गोड्या पाण्यातील माशांचा आस्वाद मुंबई व परराज्यातील खवय्यांना मिळू शकणार आहे. केवळ समुद्रकिनारपट्टीवर असलेले फिश हब अमरावतीमध्ये साकारत असून विभागातील पाच जिल्ह्यांतील धरणांतील गोड्या पाण्यातील मासळ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. केवळ जिभेचे चोचले पुरविण्यापुरताच हा हब नसून त्यातून सुमारे दीड लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. अमरावती महापालिका उभारत असलेला हा फिश हब पश्‍चिम विदर्भातील एकमेव आहे. 

पश्‍चिम विदर्भातील नऊ मोठ्या, 24 मध्यम व 472 लघुसिंचन प्रकल्पांसह तलावांमधून मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. या भागातील मत्स्य व्यवसायास बाजारपेठ मात्र स्थानिक पातळीवरच मिळते व त्यामुळे मागणी असूनही पुरवठा होऊ शकत नसल्याने आर्थिक नुकसानही होते. या भागात व्यवसाय न फोफावण्याचे हे मुख्य कारण असून त्यास चालना देण्याकरिता मुंबई व रत्नागिरीच्या धर्तीवर फिश हब महापालिकेने उभारण्याची योजना आखली.

तत्कालीन आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी या प्रकल्पासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. तत्कालीन आयुक्त संजय निपाणे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या प्रकल्पास विद्यमान आयुक्त प्रशांत रोडे यांनी तडीस नेण्यासाठी कंबर कसली असून सद्यस्थितीत प्रकल्पाचे काम पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक झाले आहे. नोडल ऑफीसर डॉ. सचिन बोंद्रे व प्रोजेक्‍ट ऑफीसर सुधीर गोटे त्यासाठी कष्ट घेत आहेत. विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी प्रकल्पाकरिता लागणारे सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. 

असा असेल हब 

कोंडेश्‍वर मार्गावर महापालिकेच्या पावणेदोन हेक्‍टर क्षेत्रात फिश हब उभारण्यात येत आहे. यामध्ये फिश मार्केटसह फिश ड्रेसिंग सेंटर व आईस प्लांट असून 30 होलसेल शॉप, रिटेल शॉप, प्रत्येकी पाच मेट्रिक टन क्षमतेची चिल्ड रूम व आईस रूम राहणार आहे. ड्रेसिंग सेंटरमध्ये 250 मेट्रिक टन क्षमतेचा स्टोअरेज टॅंक, तीन मेट्रिक टन क्षमतेचा ब्लास्ट फ्रिजर, तीन चिल्ड रूम आहेत. चिल्ड रूममध्ये रॉ मटेरियल, ट्यूब आईस व फिनीस प्रॉडक्‍ट अशा तीन स्वतंत्र रूम आहेत. प्रतिदिवस 20 मेट्रिक टन क्षमतेचा आईस प्लांट आहे. 

विपणन व्यवस्था 

समुद्रातील व स्थानिक धरणांतील मासे कोंडेश्‍वर येथील फिश हबमध्ये आणले जातील. त्यावर आवश्‍यक ती प्रक्रिया केल्यानंतर विक्रीसाठी खुली करण्यात येतील. हबमध्ये ठोक व किरकोळ विक्री करता येणार आहे. किरकोळ विक्रीकरिता अमरावती शहरातील शुक्रवार बाजार व बडनेरा उपनगरातील सोमवार बाजार येथे फिश मार्केट उभारण्यात येत आहे. 

दीड लाख लोकांना मिळणार रोजगार 

अमरावती येथे उभारण्यात येत असलेल्या फिश हबच्या माध्यमातून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील सुमारे दीड लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने रोजगार उपलब्ध होणार आहे. मत्स्य व्यवसायास यामुळे या भागात चालना मिळणार असून खवय्यांची हौसही पूर्ण होणार आहे. मात्र त्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com