त्रेसष्ट वाहनधारकांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला आली जाग, आता घेणार हा निर्णय

मिलिंद उमरे
Thursday, 13 August 2020

६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला पैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत. या दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत प्रक्रिया राबवा, जनजागृती करा, अशा सूचना त्यांनी वाहतूक व पोलिस विभागाला दिल्या.

गडचिरोली : जिल्ह्यात दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले असून अवघ्या सात महिन्यांत तब्बल ६३ वाहनधारकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या अपघातांत मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये ३७ दुचाकीस्वार असल्याची बाब जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत पुढे आली आहे. यातील बहुतांश दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी हेल्मेट सक्तीचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील अपघातांविषयी आढावा घेतला. यामध्ये जिल्ह्यात जानेवारीपासून आत्तापर्यंत झालेल्या ६१ अपघातांविषयी माहिती घेतली. यामध्ये एकूण ६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला पैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत. या दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत प्रक्रिया राबवा, जनजागृती करा, अशा सूचना त्यांनी वाहतूक व पोलिस विभागाला दिल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहित गर्ग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे, वाहतूक शाखेच्या पुनम गोरे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, आरोग्य विभागाचे शल्यचिकित्सक डॉ. जयंत पर्वते, पोलिस उपअधीक्षक (गृह) गोरख गायकवाड आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंगला म्हणाले की, यापुढे प्रत्येक अपघाताचे मायक्रोस्तरावर विश्‍लेषण करून अहवाल तयार करावे. जेणेकरून त्यावरून ब्लॅक स्पॉट(वारंवार अपघाताचे ठिकाण) ठरविण्यास मदत होईल.

तसेच अपघातांच्या विश्‍लेषणावरून नेमक्‍या चुका कोणत्या आहेत व त्यावर उपाययोजना काय काय राबविता येतील याचा अभ्यास करता येईल. येत्या काळात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक गाव - शहरांमध्ये जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

गडचिरोलीच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका तयार केली असून या मार्गदर्शिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते या बैठकीदरम्यान करण्यात आले. ही पुस्तिका महाविद्यालयीन युवकांसाठी महत्त्वाची मार्गदर्शिका ठरणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. शाळा सुरू झाल्यावर या पुस्तिकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना संदेश देण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सविस्तर वाचा  - बापाची मुलीला आर्त विनवणी, 'बेटा मला येथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे तुमच्यासाठी'

एक महिन्याने अंमलबजावणी...
या बैठकीत जिल्हाधिकारी सिंगला म्हणाले की, जिल्ह्यात हेल्मेट सक्तीबाबत प्रक्रियेला सुरुवात करावी. सुरुवातीला एक महिना वाहनधारकांची जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट सक्ती लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सिंगला यांनी बैठकीत सांगितले.
संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now helmet is must in Gadchiroli district