कॉंग्रेसचे आता मिशन विधानसभा

अनिल कांबळे
शुक्रवार, 14 जून 2019

नागपूर : जिल्ह्यात डझनभर आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, पालकमंत्री असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पाच लाखांचे मताधिक्‍य मिळू शकले नाही. उलट कॉंग्रेसच्या मतांमध्ये तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्याची चांगली संधी असून आता विधानसभेसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिले.

नागपूर : जिल्ह्यात डझनभर आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, पालकमंत्री असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पाच लाखांचे मताधिक्‍य मिळू शकले नाही. उलट कॉंग्रेसच्या मतांमध्ये तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्याची चांगली संधी असून आता विधानसभेसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिले.
कॉंग्रेसची मंथन बैठक गुरुवारी देवडिया कॉंग्रेस भवनात घेण्यात आली. यात विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर विधानसभानिहाय उमेदवार निवड समिती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या बूथवर कमी मते मिळाली त्याचा लेखाजोखा घेऊन बूथ कमिटींना संबंधित भागात जनसंपर्क वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीला प्रदेश चिटणीस अतुल लोंढे, ऍड. अभिजित वंजारी, माजी अध्यख शेख हुसैन, माजी आमदार यशवंत बाजीराव, माजी महापौर नरेश गांवडे, नगरसेवक बंटी शेळके, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभूर्णे, जयंत लुटे, नगरसेवक रमेश पुणेकर, रश्‍मी उईके, दर्शनी धवड, उज्ज्वला बनकर, नितीन साठवणे, ऍड. अक्षय समर्थ, प्रशांत धवड प्रामुख्याने उपस्थित होते.
निष्क्रियांना घरी बसवणार
लोकसभेच्या निवडणुकीत निष्क्रिय राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना घरी बसवण्यात येणार असल्याचा इशारा ठाकरे यांनी दिला. अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन केले जाईल. त्यानुसार कार्यकारिणीत फेरबदल केले जातील. चांगल्या नव्या दमाच्या सक्रिय कार्यकर्त्यांना संघटनेत स्थान दिले जाईल. ज्यांना पक्षाचे काम करायचे नाही त्यांनी स्वतःच बाजूला व्हावे. अनेक पदाधिकारी पदानुसार जबाबदारी स्वीकारत नाही. त्याचा फटका पक्षाला बसतो. त्यामुळे त्यांनी स्वतःहूच बाजूलाच व्हावे, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली.
नितीन गडकरी व भाजपच्या नेत्यांनी पाच लाखांचे मताधिक्‍य घेऊन लोकसभेची निवडणूक जिंकू असा दावा केला होता. मात्र, कॉंग्रेसने तो फोल ठरवला. कोट्यवधींच्या निव्वळ घोषणा आणि दावे करणे हे भाजपच्या नेत्यांची सवय आहे. ही बाब मतदारांच्याही लक्षात येऊ लागली. आता विधानसभेत आम्ही त्यांना कॉंग्रेसची ताकद दाखवू.
-विकास ठाकरे, अध्यक्ष, शहर कॉंग्रेस

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the mission assembly of Congress