आता ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी

साईनाथ सोनटक्के
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

चंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव गमवावा लागला. यामुळे एम.टेक.चे शिक्षण घेतलेल्या दोन युवकांनी त्यावर उपाय शोधून काढला आहे. त्यांनी पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन यंत्र तयार केले. त्याची क्षमता दहा लिटरची आहे. एवढ्या क्षमतेचे देशातील हे पहिले ड्रोन असल्याचा दावा या युवा संशोधकांनी केला आहे.

स्वप्नील शेंडे आणि जीवन कुंभरे यांची बी.टेक.चे शिक्षण घेताना ओळख झाली. स्वप्नील चंद्रपूरचा, तर जीवन यवतमाळ जिल्ह्यातील आहे. लगतच्या जिल्ह्यातील रहिवासी असल्याने दोघांची मैत्री घट्ट झाली. त्यानंतर दोघांनी पुढे एम.टेक.चे शिक्षण घेतले. या वेळी या दोघांनी एरोस्पेस हा विषय निवडला. यातून संशोधनाचे धडे घेतले. एम.टेक.चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. यातून ‘स्कॉय किपर’ नावाची कंपनी सुरू केली. पुण्यात कंपनीचे कार्यालय सुरू केले. मागील वर्षी राज्यात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या. ग्रामीण भागाशी नाळ जुळून असल्याने शेतकऱ्यांना फवारणीसाठी मजूर मिळत नसल्याची कल्पना आधीपासूनच होती. त्यामुळे या दोघांनी फवारणीसाठी ‘ड्रोन’ तयार करण्याचे ठरविले. गेल्या दोन महिन्यांत १० लिटर क्षमतेचे फवारणी ड्रोन तयार केले आहे. त्यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च आला. या यंत्राद्वारे १२ मिनिटांत १० एकर शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी केली जाऊ शकते. यात रडार सिस्टिमचा अंतर्भाव आहे. त्यामुळे यंत्र उडताना खाली न जाता थेट उंचीवर जाते. त्यानंतर फवारणी करून उड्‌डाण घेतलेल्या जागेवर पुन्हा येऊन थांबते. यंत्राला सेंसर असल्याने मार्गात विजेचे तार किंवा खांब येत असल्यास तेवढा परिसर सोडून आजूबाजूने तो मार्गक्रमण करतो, असे स्वप्नील शेंडे यांनी सांगितले. आपला हा प्रयोग देशातील पहिला असल्याचे जीवन कुंभरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब आणि तेलंगणा राज्यातून ‘फवारणी ड्रोन’ची मागणी आहे. येत्या काळात या राज्यात ड्रोन पाठविण्यात येणार असल्याचेही तो म्हणाला.

फवारणीसाठी तयार केलेले ड्रोन यंत्र शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. यातून विषबाधेमुळे मृत्यू होण्याच्या घटना टाळता येऊन मजुरांच्या कमतरतेवरही मात करता येणार आहे.
- स्वप्नील शेंडे, युवा संशोधक, चंद्रपूर.

Web Title: Now spray pesticide with the help of drone