आता चाखा विदर्भातील खजुराची चव

file photo
file photo

नागपूर : विदर्भातील अतिउष्ण तापमानात खजूर लागवड यशस्वी होते का? याची चाचपणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे करण्यात येणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांतील कृषी विज्ञान केंद्रासह विद्यापीठाच्या काटोल आणि नागपूर प्रक्षेत्रावर खजूर लागवड करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सावी थंगावेल या केरळच्या शेतकऱ्याने नागपूर जिल्ह्यातील मोहगाव झिल्पी शिवारात खजूर लागवड केली. दोन एकरांवर त्यांनी बरी जातीचे खजूर दहा वर्षांपूर्वी लावले. लागवडीनंतर गेल्या चार वर्षांपासून ते खजुराचे यशस्वी उत्पादनही घेत आहेत. एका झाडापासून सरासरी 15 ते 20 किलो खजुराची उत्पादकता होते. 200 रुपये किलोचा दर मिळतो. शेतकऱ्याच्या या प्रयोगानंतर आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विदर्भात खजूर शेती होऊ शकते का? याची चाचपणी करणार आहे. विद्यापीठाच्या चाचण्यांमध्ये अपेक्षित उत्पादकता मिळाल्यास नव्या पिकाचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरिता कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, शशांक भराड प्रयत्नशील आहेत. त्याकरिता विदर्भातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांना त्यांच्या प्रक्षेत्रावर खजूर लागवडीचे निर्देश दिले आहेत. त्यासोबतच यंदा कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या नागपूर येथील कृषी महाविद्यालय तसेच काटोल येथील प्रादेशिक संशोधन केंद्राच्या परिसरातही प्रायोगिक तत्त्वावर खजूर लागवड करण्यात येईल. यावर्षीपासूनच या महत्त्वाकांक्षी प्रयोगाची अंमलबजावणी होणार आहे. त्याकरिता गुजरातच्या कच्छ भागातून उतीसंवर्धित रोपांच्या खरेदीचा प्रस्ताव आहे. त्यासोबतच विदर्भात दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा खजूर लागवड करणाऱ्या सावी थंगावेल यांच्या शेतात वर्षभर कृषी विद्यापीठ तज्ज्ञाची नेमणूक राहील. त्या माध्यमातून खजूर शेतीचे व्यवस्थापन, बहर येण्याचा कालावधी, फळधारणा या साऱ्या बाबी अभ्यासल्या जातील.
खजूर लागवड नागपूर, काटोल व विदर्भात बहुतांश ठिकाणी करून त्याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर या पिकाची शिफारस विदर्भाकरिता करण्याचे प्रस्तावित आहे.
- डॉ. प्रकाश नागरे, अधिष्ठाता उद्यानविद्या,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com