दहावीच्या विद्यार्थ्यांना आता यु-टयुबवरून मार्गदर्शन

विवेक मेतकर
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

- बालभारतीचा उपक्रम
- कृतिपत्रिकांबाबत शंकांचे होईल निरसन

अकोला- यावर्षीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका सोडविण्यासाठी दिल्या जाणार आहेत. बालभारतीकडून या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. यु-टयुबवरील बालभारती चॅनलवर गुरुवारपासून (ता.06) उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (2018-19) बदलण्यात आला आहे. त्याचबरोबर दहावीच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्येही यंदापासून मोठयाप्रमाणात बदल करण्यात आले आहेत. पाठांतराएेवजी विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करावे, त्यांची मते नोंदवीता यावे यासाठी कृतिपत्रिका देण्यात येणार आहे. या कृतिपत्रिकांचे सराव प्रश्नसंच ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ बालभारतीने तयार केले आहेत. यु-टयुबवरील बालभारतीच्या चॅनलवर गुरुवारपासून (ता.06) उपलब्ध केले जाणार आहेत.

बालभारतीच्या व्हिडीओमध्ये सराव कृतिपत्रिकांमधील उत्तरांच्या संदर्भाने तज्ज्ञांचे मत व मार्गदर्शन उपलब्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी सराव कृतिपत्रिका सोडविल्यानंतर त्यांच्या कुठे चुका झाल्या त्या या व्हिडीओ पाहून दुरूस्त करता येणार आहेत. त्यामुळे कृतिपत्रिका सोडविताना विद्यार्थ्यांच्या नेमक्या कुठे चुका होतात, त्या टाळण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे याची माहिती विद्यार्थ्यांना या व्हिडीओव्दारे मिळणार आहे.

शंकांचे होईल निरसन
दहावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कृतिपत्रिकांचे यंदा पहिलेच वर्ष असल्याने याबाबत अनेक शंका विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या मनात आहेत. कृतिपत्रिकांचे सरावसंच उपलब्ध झाले आहेत, त्यामध्ये भाषा विषयांच्या कृतिपत्रिका सोडविताना वेळ पुरत नसल्याची तक्रार विद्यार्थी करीत आहेत. या पार्श्वभुमीवर यु-टयुबवर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तज्ज्ञांच्या व्हिडीओमुळे त्यांच्या सर्व शंकांचे निरसन होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Now yutube Guide 10th Class students