'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' योजनेतील ऑनलाइन प्रक्रियेत अडथळे, तंत्रज्ञही फोन उचलत नाहीत

obstacles in the online process of my family my responsibilities scheme in amravati
obstacles in the online process of my family my responsibilities scheme in amravati

अमरावती : राज्यात कोविडच्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमात ऑनलाइनचे अनेक अडथळे येत आहेत. सदर अ‌ॅपमध्ये अनेक उणिवा असल्याने ऑनलाइन डेटा एन्ट्री होत नसल्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेने मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. 

अधिकाऱ्यांच्या मते, 14 सप्टेंबरला अ‌ॅपचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, ज्या फाइल देण्यात आल्या होत्या त्याने जिल्हा लॉगीन होत नव्हता. त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्यांना या अ‌ॅपमध्ये माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अ‌ॅपमध्ये लॉगीन केल्यानंतर आशाचे नाव पाठविलेल्या फाइलमध्ये असूनही पुन्हा प्रयत्न करा, असा संदेश येतो. अ‌ॅपची संपूर्ण लिंक मोबाईलवर इन्स्टॉल होत नाही. डाटाबेसमधील सर्व क्रमांक रजिस्टर होत नाहीत. अ‌ॅप बऱ्याच वेळा लॉगीन होत नाही, किंवा लॉगीन झाले तरी थोड्या वेळाने बंद होते. त्याची गती सुद्धा खूपच संथ आहे. अ‌ॅपचे नवीन व्हर्जन वापरले तरी वारंवार लॉगीनमध्ये अडथळे येतात. एका सदस्याचे नाव भरल्यानंतर दुसऱ्या सदस्याचे नाव भरताना आपोआप लॉगआउट होते. कुटुंबातील संख्या 4 टाकली असतानाही पाचव्या व्यक्तीचे नाव भरावे, असा संदेश दिला जातो. एकाच व्यक्तीचे नाव दुसऱ्यांदा भरले तरी त्याचा समावेश होते. एखाद्या व्यक्तीचे तापमान सामान्य असले तरी रेफर करा, असा संदेश येतो. अनेकदा सदस्यांची संपूर्ण माहिती भरली तरी सबमीट होत नाही. जिल्ह्याची डॅशबोर्डाची एकूण आकडेवारी तालुक्‍याच्या आकडेवारीशी जुळत नाही, अशा अनेक समस्या आरोग्य कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत.

अ‌ॅपमध्ये तत्काळ दुरुस्त्या करा - 

ही मोहिम सुरू करण्यापूर्वीच अ‌ॅपमधील त्रुट्या दूर करणे आवश्‍यक होत्या. मोहिम सुरू झाल्यानंतर 15 दिवसांनंतरही अ‌ॅपमधील त्रुटी कायमच आहेत. आशा स्वयंसेविकांना अ‌ॅपचा वापर अवजड झालेला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कार्यक्षेत्रामध्ये काम करून सुद्धा ते दिसून येत नाही. त्यामुळे या अ‌ॅपमधील तांत्रिक त्रुट्या तत्काळ दुरुस्त कराव्या, अशी मागणी आरोग्य अधिकारी संघटनेकडून करण्यात आली आहे. 

तंत्रज्ञांच्या फोनचा प्रश्‍न -
तांत्रिक त्रुटी सुधारण्यासाठी तंत्रज्ञ सुद्धा नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्ती फोनच उचलत नाहीत, असा अनुभव अधिकारी व कर्मचाऱ्यांना येत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com