निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे चुकीचे मार्गदर्शन उमेदवारांना भोवले; निवडणुकीपासून वंचित

Officers did wrong guidance to candidates in Gram panchayat Elections
Officers did wrong guidance to candidates in Gram panchayat Elections

चामोर्शी  (जि. गडचिरोली) : ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरण्यासंदर्भात चुकीची माहिती देत चुकीचे मार्गदर्शन करत अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याने आपल्याला निवडणुकीपासून वंचित राहावे लागले, असा आरोप वेणू भांडेकर व मधुकर भांडेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवार (ता. 8) केला. तसेच चुकीचे मार्गदर्शन करून फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

या पत्रकार परिषदेत माहिती देताना वेणू भांडेकर म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यांमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यातच गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून चामोर्शी तालुक्‍यातील एकूण 69 मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या व ऑनलाइन फॉर्म भरावे, अशा सूचनाही संबंधित विभागाकडून देण्यात आल्या. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ऑनलाइन फार्म संदर्भात ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावरून कोणतीही जनजागृती न केल्याने उमेदवारांमध्ये फार्म भरण्यास संभ्रम निर्माण झाला. 

अशातच ज्या उमेदवारांनी ऑनलाइन फार्म भरले, त्यातील काही उमेदवारांचे फार्म प्रभाग क्रमांक अ, ब, कनुसार योग्य नाही, असे चुकीचे मार्गदर्शन संबंधित विभागाकडून तपासणीअंती केले गेल्याने उमेदवारांना आपला फार्म मागे घ्यावा लागला. म्हणून चुकीची माहिती देऊन फार्म मागे घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेतून वेणू दीपक भांडेकर व भाजपचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर यांनी केली आहे. चामोर्शी तालुक्‍यातील ग्रामपंचायत वालसरा येथील वेणू दीपक भांडेकर यांनी प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वसाधारण स्त्रिया राखीव जागेकरिता नामांकन सादर केला होता. 

या प्रभागातून प्रभाग क्रमांक 3 ब सर्वसाधारण स्त्री उर्वरित दोन उमेदवारांनी याच प्रभागातून प्रभाग क्रमांक तीननुसार सादर केलेला होता. असे असतानासुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्याला प्रभागातील क्रमांक 3 अमधील उमेदवार बिनविरोध होणार असल्याचे सांगून चुकीची माहिती दिल्यामुळे व तुमच्या पॅनेलमधील उमेदवारांचे दोन फॉर्म एकाच जागेचे असल्याने निवडणूक लढवावी लागेल असे सांगितल्याने त्यासाठी तुम्हाला प्रभागातून एक फार्ममागे घ्यावे लागले, अशी माहिती चुकीची दिल्यामुळे आम्हाला तो फार्म मागे घ्यावा लागला. नंतर ही चूक संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान फोन करून आम्हाला बोलावले व मागे घेतलेला फार्म योग्य आहे. असे सांगून निवडणूक लढण्यास सांगितले. सोबतच गॅस सिलिंडर असे चिन्हसुद्धा देण्यात आले.

 चिन्ह वाटप झाल्यानंतर पुन्हा काही वेळाने आपला निर्णय बदलून आपल्याला निवडणूक लढवता येणार नाही, असे सांगितले. अशा पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीचे निर्णय घेऊन आमची शुद्ध फसवणूक केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात आली. त्याचबरोबर चामोर्शी तालुक्‍यातील पाच ते सहा ग्रामपंचायतीमधील उमेदवारांना अशाच पद्धतीचे चुकीचे मार्गदर्शन केल्याने तेसुद्धा संभ्रमात असून त्यांच्यावरसुद्धा अन्याय झालेला आहे. तेव्हा यासंदर्भात गडचिरोली येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्याची योग्य ती चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेतून वेणू दीपक भांडेकर, भाजपचे जिल्हा महामंत्री मधुकरराव भांडेकर, बंगाली सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, सुरेश भांडेकर, रामचंद्र भांडेकर, शुभम मेश्राम, मोरेश्‍वर सातपुते यांच्यासह अनेक ग्रामीण भागातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

फेटाळला आरोप...

चामोर्शीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी आकाश अवतारे व निवडणूक निर्णय अधिकारी बालपांडे यांना विचारणा केली असता आपण कोणत्याही उमेदवारांना चुकीचं मार्गदर्शन केले नसून योग्य मार्गदर्शन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात शासनाच्या अटी, शर्ती ठेवूनच केले आहे. अ, ब, क असा कुठल्याही प्रकारचा प्रवर्गाचा प्रकार नसून तो समजण्यासाठी शासनाच्या संगणकीय प्रणालीनुसार असलेला भाग आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला आम्ही योग्य ती माहिती दिलेले असून कुणावरही अन्याय केला नाही. ग्रामपंचायत वालसरा येथील प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवाराने स्वतःहून फार्म मागे घेतला आहे. त्यामुळे चुकीचे मार्गदर्शन करून संबंधित उमेदवारावर अन्याय झाला, असे म्हणता येत नाही. एकूण ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात अधिकाऱ्यांवर केलेले आरोप, हे चुकीचे असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com