अबब! हे तेलाचे भाव आहेत की सोन्याचे? गृहिणी हवालदिल

soybean_oil
soybean_oil

सिंदी (जि. वर्धा ) : सर्वसामान्य नागरिकांसमोरची संकटाची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. आधीच कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळित झाले असून अनेकांचा रोजगार हिरावला आहे. सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच भर म्हणून जीवनावश्‍यक वस्तूंच्या भावात सातत्याने वाढ होते आहे. दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या सर्व खाद्यतेलांचे भाव वधारले आहेत. सोयाबीनच्या तेलाने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

संपूर्ण मानव जातीवर कोरोनाच्या रूपाने मोठे संकट कोसळले आहे. मार्चपासून आर्थिक उलाढाल मंदावली आहे. त्यात भारत देश हा विकसनशील देशांच्या यादीत येतो. येथे मोठ्या संख्येने नागरिक दारिद्य्र रेषेखाली जीवन जगतात. दररोज कमवून खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोना महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, अनेकांचा रोजगार हिरावला, अनेकांच्या हातचे काम गेले. अशा परिस्थितीत सर्वांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

यात आणखी भर म्हणून दैनंदिन जीवनावश्‍यक वस्तूंच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. भाजीपाला, डाळ यासह किराणा मालाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. स्वयंपाकघरातील अति महत्त्वाची वस्तू खाद्यतेल होय. स्वयंपाक करायचा किंवा कोणतेही पक्‍वान्न बनवायचे म्हटले तर सर्वात अगोदर आठवण येते खाद्य तेलाची. तेलाशिवाय कोणताच पदार्थ बनवला जात नाही. आहारात तेलाचा सर्वाधिक वापर होतो.

गत काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या भावात दररोज वाढ होत आहे. सोयाबीनचे पीक निम्मे गेल्याने तेलाचे भाव वाढल्याचे व्यापारी बोलत आहे. आहारात सर्वाधिक सोयाबीन तेलाचा वापर होतो. इतर तेलापेक्षा सोयाबीनचे तेल स्वस्त आहे, पण आता सोयाबीन तेलाने शंभरी पार केली आहे. घाऊक बाजारात सोयाबीनचे तेल १०५ ते ११० रुपये प्रति किलो झाले आहे. शेंगदाणा तेल १५० ते १६० रुपये प्रती किलो, जवस तेल १२० रुपये किलो आहे.

खाद्य तेलाचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असून सर्वसामान्य कुटुंबांना याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटामुळे अगोदरच पैशाची चणचण आणि त्यात जीवनावश्‍यक दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com