वाडीत वृद्ध दाम्पत्याचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

अज्ञात आरोपीने घरात एकटे असलेल्या वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केला. यात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सुरक्षानगर येथे  काल (ता. १४) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

वाडी - अज्ञात आरोपीने घरात एकटे असलेल्या वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केला. यात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सुरक्षानगर येथे  काल (ता. १४) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. मृत दाम्पत्याची मुलगी कामावरून घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शंकर चंपाती (७०) व सीमा चंपाती (६०) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शंकर चंपाती यांचा दत्तवाडी चौकात नारळपाणी विक्रीचा व्यवसाय होता. पत्नी घरीच राहायची. त्यांना प्रियंका नावाची मुलगी आहे. प्रियंका आज नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता आपल्या कामावर गेली. यावेळी आई-वडील घरीच होते. दुपारच्या सुमारास ते दोघेही घरीच असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान, सायंकाळी ८ वाजता प्रियंका घरी आली असता आई-वडील मृतावस्थेत आढळले. दोघांच्याही डोक्‍यावर मारल्याच्या जखमा होता. घरातील कुठल्याही साहित्याची फेकाफेक झाल्याचे आढळून आले नाही. तसेच कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जागच्या जागी होती. यावरून हा चोरी किंवा घरफोडीचा प्रकार नसावा असे लक्षात येते. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त झोन एकचे विवेक मासाळ व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: old couple murder in wadi

टॅग्स